CSK vs KKR : चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज धोनीबाबत काय म्हणाला?

Ruturaj Gaikwad CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात तिसरा विजय मिळवला. ऋतुराज या विजयानंतर महेंद्रसिंह धोनी याच्याबाबत काय म्हणाला?

CSK vs KKR : चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज धोनीबाबत काय म्हणाला?
ruturaj gaikwad captain reaction,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 09, 2024 | 12:31 AM

कॅप्टन ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने एमए चिदंबरम या घरच्या स्टेडियममध्ये आयपीएलच्या 17 व्या मोसमातील तिसरा विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सने या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सचा विजयी रथ रोखला. कोलकाताने विजयासाठी दिलेलं 138 धावांचं आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून 14 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. चेन्नईने 17.4 ओव्हरमध्ये 141 धावा केल्या. कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंह धोनी या जोडीने चेन्नईला विजयापर्यंत पोहचवलं.

ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ऋतुराज गायकवाडने चेन्नईसाठी 58 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 67 धावा केल्या. ऋतुराजचं कर्णधार म्हणून हे पहिलवहिलं अर्धशतक ठरलं. तर धोनी 1 धावेवर नाबाद परतला. तर त्याआधी रचीन रवींद्र याने 15, डॅरेल मिचेल 25 आणि शिवम दुबे याने 28 धावांची खेळी केली. चेन्नईच्या या तिसऱ्या विजयानंतर कॅप्टन ऋतुराज काय म्हणाला, त्याने कुणाचा उल्लेख केला? हे जाणून घेऊयात.

ऋतुराजने विजयानंतर आयपीएलमधील आपल्या पहिल्या अर्धशतकी खेळीच्या आठवणीला उजाळा दिला. ऋतुराजने आयपीएलमधील पहिलंवहिलं अर्धशतक हे 2020 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना ठोकलं होतं. तेव्हाही ऋतुराजसोबत धोनी बॅटिंगला होता. तर आताही ऋतुराज आणि धोनी दोघे होते. ऋतुराजने हाच समान धागा धरुन हीच आठवण विजयानंतर सांगितली.

ऋतुराज काय म्हणाला?

“मी जुन्या आठवणीत रमलो. आयपीएलमधील माझ्या पहिल्या अर्धशतकावेळेस अशीच स्थिती होती. तेव्हाही माही भाई (धोनी) माझ्यासोबत होता. आम्ही दोघांनी सामना संपवला”, असं गायकवाड धोनीबाबत म्हणाला.

“विकेट किंचित अवघड होती, दबावाखाली बाजू ठेवायची नव्हती. 150-160 अशी विकेट होती. मला या टीमसोबत कोणाला काही सांगण्याची गरज नाही. T20 मध्ये काहीवेळा तुम्हाला पुढे जाण्यासाठी थोडी नशिबाची साथ पाहिजे असते”, असंही ऋतुराज म्हणाला.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.