
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पण सूर्यकुमारचा फॉर्म आणि जसप्रीत बुमराह वगळता असणारं गोलंदाजी युनिट यामुळे क्रीडाप्रेमींना चिंता वाटू लागली आहे. असं असताना आयसीसी टी20 स्पर्धेत गौतम गंभीर पहिल्यांदाच प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे गौतम गंभीर जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे संघाचं पूर्ण लक्ष्य हे टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर आहे. दुसरीकडे, 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी आतापासून प्लान आखला जात आहे. टीम इंडिया आणि गौतम गंभीरला वर्ल्ड चॅम्पियन कोच करण्यासाठी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याबाबत खुलासा खुद्द टीम इंडियाचे प्रशिक्षकाने केला आहे. तसेच संघात काही वाद बातम्यांचं खंडनही केलं आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाचे असिस्टंट प्रशिक्षक सितांशु कोटकने याबाबत सांगितलं. राजकोटमध्ये 14 जानेवारीला दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सितांशु कोटकने पत्रकार परिषदेत खुलासा केला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. प्रशिक्षक गौतम गंभीर त्यांच्यासोबत प्लानिंग करत आहे. कोटक यांनी पुढे सांगितलं की, रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येक सामन्यात विजय मिळवू इच्छितात. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पुढच्या वर्षी होणार आहे. यासाठी 18 महिन्यांचा कालावधी आहे. या स्पर्धेपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माला फिटनेस आणि फॉर्म कायम राखायचा आहे.
सितांशु कोटक यांनी सांगितलं की, ‘ते निश्चितच नियोजन करत आहेत. आता ते दोघेही एकाच फॉरमॅटमध्ये खेळत असल्याने त्यांना भारतीय संघाने सर्वत्र विजय मिळवावा असे वाटते. दोघांकडे असलेल्या अनुभवाच्या आधारे ते इतर खेळाडूंसोबत बरेच विचार शेअर करू शकतात आणि ते तसे करतात. ते गौतमसोबत एकदिवसीय फॉरमॅट आपल्याला खेळायचे असलेले सामने आणि दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबात नियोजन यावर चर्चा करतात.’