CSK ने पुन्हा एकदा तीच चूक केली आहे का? की त्यांचा दाव योग्य ठरणार
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात सीएसके विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असा सामना होणार आहे. या पहिल्याच सामन्याआधी सीएसके चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. कारण आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला धोनी आता कर्णधार नसणारे. पण धोनी खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे.

आयपीएल 2024 ची सुरुवात 22 मार्चपासून होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये होणार आहे. पण त्याआधी सीएसकेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कारण आयपीएल सुरु होण्याच्या एक दिवस आधी सीएसकेने कर्णधार बदलला आहे. एमएस धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. सीएसकेने अचानक असे पाऊल का उचलले. याबाबत अनेकांना प्रश्न आहे. 2022 मध्ये देखील चेन्नईने धोनीच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार केले होते. पण त्याने मध्येच कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर धोनीला पुन्हा ही जबाबदारी घ्यावी लागली होती. धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
जडेजाला मध्ये सोडावे लागले होते पद
जडेजाच्या नेतृत्वात खेळत असताना संघाची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, मोसमाच्या मध्यावर धोनीला पुन्हा कर्णधारपद स्वीकारावे लागले. आता सीएसकेने पुन्हा एकदा दोन वर्षानंतर नवा प्रयोग केला आहे. ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवल्याने CSK आपली दोन वर्षे जुनी चूक पुन्हा करत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
IPL 2024 मध्ये गायकवाड सीएसकेचं नेतृत्व करणार आहे. पण CSK ने 2022 मध्ये जेव्हा रवींद्र जडेजाला कर्णधार केले होते. तेव्हा चेन्नई संघाची अवस्था इतकी वाईट होती की 8 सामन्यांपैकी चेन्नईला फक्त 2 सामने जिंकता आले होते.
जडेजाच्या नेतृत्वात फ्लॉप कामगिरीमुळे एमएस धोनीकडे पुन्हा संघाची कमान सोपवण्यात आली. माहीने पुन्हा जबाबदारी स्वीकाराली. २०२२ ला सीएसके गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर होता.
ऋतुराजच्या कामगिरीकडे लक्ष
रवींद्र जडेजा नंतर आता संघाने ऋतुराज गायकवाडकडे जबाबदारी दिली आहे. कदाचित संघाने भविष्याचा विचार करुन हा निर्णय घेतला असेल. त्याच्यामध्ये असलेले गुण कदाचित त्याला या पदासाठी योग्य ठरवत असतील. ऋतुराज मैदानावर खूप शांत दिसतो आणि दबावाखाली देखील तो त्याचा खेळ सुधारतो. पण आता कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तो कशी कामगिरी करतो यावर सगळ्यांचे लक्ष असणार आहे. या मोसमात त्याच्या फलंदाजीसोबतच त्याला नेतृत्व करताना ते गुण ही दाखवायचे आहेत.
