IPL 2026 स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक बदलणार? पेट्रोल डिझेल संकटामुळे मोठी मागणी
अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाचे पडसाद आता संपूर्ण जगावर उमटले आहेत. या युद्धाचा प्रभाव आता आयपीएल स्पर्धेवरही पडताना दिसत आहे. इंधन वाचण्याच्या हेतूने उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक बदलण्याची मागणी होत आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. अंतिम सामना पकडून मोजून 13 ते 14 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. असं असताना देशात पेट्रोल आणि डिझेलचं संकट घोंघावू लागलं आहे. सरकारकडून इंधनाचा वापर कमी करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. असं असताना आयपीएल 2026 स्पर्धेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. या स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी संघांनी हवाई आणि रस्ते मार्गातून जवळपास लाखो किलोमीटर अतर कापलं आहे. कारण संघांचे सामने वेगवेगळ्या शहरात होत आहेत. त्यामुळे प्रवास करणं सहाजिकच आहे. पण आता हा प्रवास कमी करण्याची मागणी होत आहे. कारण अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहेत. इंधानाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यात आयपीएल स्पर्धा सुरू असल्याने हवाई प्रवासावर अतिरिक्त दबाव वाढू शकतो.
दिल्ली आणि देशातील व्यापारी व उद्योजकांची सर्वोच्च संघटना असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे (सीटीआय) अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातून हवाई प्रवास कमी करून उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक जारी करण्याची मागणी केली आहे. प्रेक्षकांशिवाय मर्यादित मैदानांवर सामने आयोजित करण्याचे आवाहन केले. कोविड-19 महामारीच्या काळातही आयोजकांनी मर्यादित मैदानांवर आयपीएलचे यशस्वीपणे आयोजन केले होते. तसंच आयोजन आता करण्याची मागणी केली आहे. एका सामन्यासाठी 50 हजार प्रेक्षक उपस्थित राहतात. त्यामुळे हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल वाया जातं. त्यामुळे प्रेक्षकांशिवाय आयपीएल आयोजिक केल्यास पैशांची बचत होऊ शकते.
सीटीआयच्या मते, आयपीएल संघांकडून सामान्यतः वापरली जाणारी चार्टर्ड विमाने, जसे की बोईंग 737 किंवा एअरबस ए320, प्रति तास सरासरी 2400 ते 3000 लिटर इंधन वापरतात. एखादे उड्डाण अंदाजे दोन तास चालले, तर अंदाजे 5000 ते 6000 लिटर विमान इंधन वापरले जाते. विमान मोठे असेल किंवा जास्त अंतरासाठी जास्त वजन वाहून नेत असेल, तर हा आकडा 7000 ते 8000 लिटरपर्यंत वाढू शकतो. या इंधन वापराला संघांच्या अंदाजे 10 उड्डाणांनी गुणल्यास प्रत्येक संघ अंदाजे 50000 ते 70000 लिटर विमान इंधन वापरतो. त्यामुळे इंधन वाचवण्यासाठी उपाय योजना करणं गरजेचं आहे. सीटीआयचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल म्हणाले की, उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक बदलून ते प्रेक्षकांशिवाय मर्यादित मैदानांवर आयोजित करणे ही काळाची गरज आहे.