5 बॉल 5 विकेट्स, दिग्वेश राठीचा कारनामा, पाहा व्हीडिओ
Digvesh Rathi 5 Wickets In 5 Balls Video : फिरकीपटू दिग्वेश राठी याने एकाच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाचं काम तमाम केलं. दिग्वेशने 5 बॉलमध्ये 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे दिग्वेशने 5 पैकी 4 फलंदाजांचं स्टंप्स उडवले

लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठी आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) त्याच्या खास नोटबूक स्टाईल सेलीब्रेशनमुळे चांगलाच चर्चेत राहिला. दिग्वेश या नोटबूक स्टाईल सेलिब्रेशनमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकला. त्यामुळे दिग्वेशवर दंडात्मक कारवाईसह एका सामन्याची बंदीही घातली गेली होती. मात्र दिग्वेशने आपल्या फिरकीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरीही केली. दिग्वेशने आयपीएलनंतर आपली फिरकीची जादू दाखवून देत मोठा कारनामा केला आहे. दिग्वेशने एका लोकल लीगमध्ये 5 चेंडूत 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. दिग्वेशचा 5 विकेट्स घेण्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी दिग्वेशचा व्हीडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे.
दिग्वेश राठीचा ‘पंच’
दिग्वेशने एका लोकल टी 20 क्रिकेट सामन्यात धारदार बॉलिंगच्या जोरावर एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. एकट्या दिग्वशेने त्याच्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेर जाण्यास भाग पाडलं. विशेष म्हणजे दिग्वेशने या 5 पैकी 4 फलंदाजांना बोल्ड केलं. एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 4 विकेट्स घेण्याचा विक्रम हा श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या नावावर होता. मात्र दिग्वेशने 5 विकेट्स घेण्याची ही कामगिरी स्थानिक पातळीवर केली आहे.
दिग्वेश राठी याने कशाप्रकारे चतुराईने बॉल टाकून फलंदाजांना आपल्या जाळ्यात फसवलं, हे व्हीडिओत पाहू शकता. दिग्वेशने टाकलेली गूगली बॅट्समन समजूच शकले नाहीत आणि एकामागोमाग एक आऊट होऊन मैदानाबाहेर गेले. दिग्वेशने एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेत पुन्हा एकदा आपण किती प्रतिभावान आहोत, हे त्याने दाखवून दिलंय.
दिग्वेश राठी याचा व्हीडिओ एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. संजीव गोयंका यांनी दिग्वेश लखनौ टीममध्ये असल्याचा अभिमान व्यक्त केला. गोयंका यांना दिग्वेशची ही कामगिरी पाहून आश्चर्याचा धक्का बसला.
संजीव गोयंका यांची एक्स पोस्ट
Stumbled upon this clip of Digvesh Rathi taking 5 in 5 in a local T20 game. Just a glimpse of the talent that made him a breakout star for @LucknowIPL in IPL 2025. pic.twitter.com/i8739cjxpk
— Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) June 16, 2025
“स्थानिक टी 20 सामन्यात 5 बॉलमध्ये 5 विकेट्स घेणाऱ्या दिग्वेश राठीचा व्हीडिओ पाहून मी थक्क झालो”, असं गोयंका यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.
दिग्वेश राठीची आयपीएल 2025 मधील कामगिरी
दरम्यान दिग्वेश राठी आयपीएलच्या 18 व्या मोसमात लखनौ सुपर जायंट्सकडून 13 सामने खेळला. दिग्वेशने या 13 सामन्यांमध्ये 8.25 च्या इकॉनॉमीने आणि 30.64 च्या सरासरीने एकूण 14 विकेट्स घेतल्या.
