
आयपीएल 2024 स्पर्धेत दर्जेदार क्रिकेटची मेजवानी क्रीडाप्रेमींना दरवर्षी अनुभवायला मिळते. जय परायज थोड्या बहूत फरकांनी क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळतो. काही संघ प्लेऑफमध्ये पोहोचतात, काही संघांचं स्वप्न भंगतं. यावर्षी काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. तर काही संघ प्लेऑफच्या शर्यतीत एकदम वरच्या पातळीवर घर करून बसले आहेत. आयपीएल स्पर्धेत एक गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित होते ती म्हणजे फॅन बेस..प्रत्येक संघाचा एक फॅन बेस आहे. तसेच विराट कोहली, धोनी आणि रोहित शर्मा यांना मानणारा एक वर्ग आहे. असं असताना गौतम गंभीरचा एक वेगळा असा चाहता वर्ग आहे. कोलकात्याच्या फॅनसाठी गौतम गंभीर एक देव स्वरूप आहे. कारण गौतम गंभीरच्या नेतृत्वातच कोलकात्याने दोनवेळा जेतेपदावर नाव कोरलं. तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोलकात्याचा संघ सज्ज आहे. गौतम गंभीर यंदा संघाचा मेंटॉर असून कोलकात्याने स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. भूमिका जरी वेगळी असली तर त्याचं मैदानात वावरणं आहे तसंच आहे. गौतम गंभीर संघाच्या प्रत्येक निर्णयात भाग घेताना दिसत आहे.
कोलकात्याचा संघ आयपीएल गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वल स्थानी आहे. संघाने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. अधिकृतरित्या त्याची घोषणा होणं बाकी आहे. गंभीरच्या येण्याने संघात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. याचा आनंद कोलकात्याच्या चाहत्यांना झाला आहे. या बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक चाहता गंभीरला कधीच सोडून न जाण्याची विनवणी करत आहे. त्याने बांगलामध्ये गाणं गात गौतम गंभीरचं महत्त्व सांगितलं. तू आमच्या हृदयात स्थान करून आहेस, आम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस; असं मनातलं चाहत्याने सांगितलं.
Aapni amader hriday e thaaken! 💜 pic.twitter.com/v8u801GOwN
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 11, 2024
गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2012 आणि 2014 साली कोलकात्याने गौतम गंभीरच्या नेतृत्वात जेतेपद जिंकलं आहे. त्यानंतर गौतम गंभीरने 2018 मध्ये संघाची साथ सोडली आणि दिल्लीसोबत सूत जुळवलं होतं. त्यानंतर मागच्या दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर राहिला आहे. आता पुन्हा एकदा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्ससोबत आला असून मेंटॉरच्या भूमिकेत आहे.