
आशिया कप 2025 स्पर्धेआधी देशांतर्गत क्रिकेट हंगामाला दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेपासून सुरुवात झाली. भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्याकडे दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी नॉर्थ झोनच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र शुबमनला आजारपणामुळे पहिल्याच सामन्याला मुकावं लागलं. त्यामुळे शुबमनच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अंकीत कुमार याला ईस्ट झोन विरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर आता आणखी एका संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. या खेळाडूची आगामी आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील उंपात्य फेरीतील सामने 4 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहेत. याआधी एका संघाला तगडा झटका लागलाय. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने या खेळाडूला उपांत्य फेरीतील सामन्यात खेळता येणार नाहीय. त्यामुळे दुसऱ्या खेळाडूला कर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली आहेत.
टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक फलंदाज तिलक वर्मा दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तिलकच्या जागी मोहम्मद अजहरुद्दीन याला कर्णधार करण्यात आलं आहे. अजहरुद्दीन उपांत्य फेरीत साऊथ झोनचं नेतृत्व करणार आहे. तसेच अजहरुद्दीन याच्या जागी तामिळनाडूच्या के एन जगदीशन याला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आलीय. उपांत्य फेरीतील सामना हा 4 सप्टेंबरपासून बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेंस (COE) इथे आयोजित करण्यात आला आहे.
तिलक व्यतिरिक्त साऊथ झोनला आणखी एक झटका लागलाय. तामिळनाडूचा स्टार फिरकीपटू आर साई किशोर याला दुखापतीमुळे सेमी फायनलमधून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे साऊथ झोनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
साऊथ झोनने तिलक आणि आर साई किशोर या दोघांच्या जागी संघात स्पिनर अंकीत शर्मा आणि बॅट्समन शेख रशीद यांना संधी दिली आहे.
साऊथ झोनचा सुधारित संघ : मोहम्मद अजहरुद्दीन (कर्णधार), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडीक्कल, मोहित काळे, सलमान निजार, नारायण जगदीशन, त्रिपुराना विजय, तनय त्यागराजन, विजयकुमार वैशाख, निधीश एमडी, रिकी भुई, बासिल एनपी, गुरजपनीत सिंह, स्नेहल कौथंकर, अंकित शर्मा आणि शेख रशीद.
राखीव खेळाडू : मोहित रेडकर, आर समरण, एडेन एप्पल टॉम आणि आंद्रे सिद्धार्थ.