
मँचेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने या सामन्यातील तिसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडने टीम इंडियाच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात तिसरा दिवसाचा खेळ संपेपर्यंत 135 षटकांत 7 विकेट्स गमावून 544 धावा केल्या आहेत. इंग्लंडने अशाप्रकारे या सामन्यात 186 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडला 500 पार पोहचवण्यात अनुभवी फलंदाज जो रुट याने प्रमुख भूमिका बजावली. तर इतरांनीही चांगली साथ दिली. तर दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज चौथ्या दिवशी कशी कामगिरी करतात? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
इंग्लंडने दुसऱ्या दिवशी झॅक क्रॉली आणि बेन डकेट या दोघांच्या रुपात विकेट्स गमावल्या. क्रॉलीने 84 तर डकेटने 94 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडची 2 आऊट 197 अशी स्थिती झाली. त्यानंतर जो रुट आणि ओली पोप या जोडीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 बाद 225 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने जो रुटचं शतक आणि ओली पोप आणि बेन स्टोक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर 319 धावा केल्या.
ओली पोप 20 आणि जो रुटने 11 नाबाद धावांपासून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला (2 आऊट 225) सुरुवात केली. पोप-रुट जोडीने एकेरी-दुहेरी धावा जोडल्या. तसेच संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. भारतीय गोलंदाजांना दिवसाच्या सुरुवातीला विकेट मिळवता आली नाही. या जोडीने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी सेट झाल्याने भारताची डोकेदुखी वाढली. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल याने वॉशिंग्टन सुंदर याला इंग्लंडच्या डावातील 68 वी ओव्हर टाकायला दिली. सुंदरने ओली पोप याला आऊट करत इंग्लंडला तिसरा झटका दिला. सुंदरने पोपला स्लिपमध्ये केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं. सुंदरने 4 ओव्हरनंतर हॅरी ब्रूक याला आऊट केलं.
भारताने इंग्लंडला झटपट 2 झटके दिल्याने कमबॅक करण्याची संधी होती. मात्र जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स या जोडीने तसं होऊ दिलं नाही. या अनुभवी जोडीने पाचव्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी करत इंग्लंडला 500 धावांजवळ आणून ठेवलं. रुटने या दरम्यान कसोटी कारकीर्दीतील 38 वं शतक पूर्ण केलं.
त्यानंतर बेन स्टोक्स 66 धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. रुटने या दरम्यान एक बाजू लावून धरली आणि 17 व्यांदा 150 धावा केल्या. मात्र त्यानंतर रुटला एकही धाव करता आली नाही. रवींद्र जडेजा याने रुटला 150 धावांवर बाद केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह याने जेमी स्मिथ याला 9 धावांवर आऊट केलं. त्यानंतर मोहम्मद सिराज याने ख्रिस वोक्स याला 9 रन्सवर बोल्ड केलं. इंग्लंडने 528 धावांवर सातवी विकेट गमावली. त्यानतंर बेन स्टोक्स पुन्हा बॅटिंगला आला.
तिसरा दिवसही इंग्लंडच्या नावावर
Stumps on Day 3 in Manchester 🏟️
3⃣ wickets in the final session for #TeamIndia 👌👌
England 544/7 in the 1st innings, lead by 186 runs.
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/Q6rQDxioLO
— BCCI (@BCCI) July 25, 2025
स्टोक्सने लियाम डॉसन याच्यासह आठव्या विकेटसाठी नॉट आऊट 16 रन्स जोडल्या. इंग्लंडने 135 षटकांपर्यंत 7 विकेट्स गमावून 544 धावा केल्या. अशाप्रकारे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. स्टोक्स 134 चेंडूत 77 धावांवर नाबाद आहे. तर लियाम डॉसन 52 चेंडूत 21 धावांवर नाबाद परतला. टीम इंडिया वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जसप्रीत बुमराह,अंशुल कंबोज आणि मोहम्मद सिराज या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. इंग्लंडकडे पहिल्या डावात 186 धावांची आघाडी आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवशी इंग्लंडला झटपट 3 झटके देत गुंडाळावं, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.