
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा आणि निर्णायक कसोटी सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात येतणार आहे. सामन्याला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारतासाठी हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. इंग्लंड या मालिकेत 3 सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. या मालिकेत आतापर्यंत भारताचा अनुभवी सलामीवीर केएल राहुल याने अप्रतिम कामगिरी केली आहे. केएलने त्याच्या अनुभवाच्या जोरावर इंग्लंडची चांगलीच धुलाई केली आहे. केएलकडून उर्वरित सामन्यांतही अशीच कामगिरी अपेक्षित आहे. केएलला या मालिकेत माजी दिग्गज सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या तिघांनंतर खास कामगिरी करणारा चौथा भारतीय फलंदाज होण्याची संधी आहे.
केएलला मँचेस्टरमध्ये मोठा कीर्तीमान करण्याची संधी आहे. माजी फलंदाज विराट कोहली याला त्याच्या कसोटी कारकीर्दीत असं करता आलं नाही. केएलला इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकटमध्ये 1 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. केएल 1 हजार धावांपासून फक्त 11 धावा दूर आहे. केएलने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 12 सामन्यांमध्ये 989 धावा केल्या आहेत.
टीम इंडियासाठी आतापर्यंत फक्त तिघांनाच इंग्लंडमध्ये कसोटीत 1 हजार पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. सचिन तेंडुलकर याने इंग्लंडमध्ये 17 कसोटीत 54.31 च्या सरासरीने 1 हजार 575 धावा केल्या होत्या. सचिनने या खेळीत 4 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली होती. तर या यादीत दुसऱ्या स्थानी द वॉल अर्थात राहुल द्रविड विराजमान आहे. द्रविडने 13 सामन्यांमध्ये 68.8 च्या सरासरीने 1 हजार 376 धावा केल्या होत्या.
लिटिल मास्टर अर्थात सुनील गावसकर यांनी इंग्लंडमध्ये 16 कसोटी सामन्यांमध्ये 41.14 च्या सरासरीने 1 हजार 152 धावा केल्या होत्या. तर केएल राहुल या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर विराट कोहली याने 15 सामन्यांमध्ये 33.65 च्या सरासरीने 976 धावा केल्या होत्या. विराटने या दरम्यान 2 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली होती.
दरम्यान केएलने इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये 62.50 च्या सरासरीने 375 धावा केल्या आहेत. केएल या मालिकेत सवाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. केएलने या मालिकेत 2 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे चौथ्या आणि अटीतटीच्या सामन्यात केएलकडून यापेक्षा सरस कामगिरीची आशा भारतीय चाहत्यांना असणार आहे.