ENG vs NZ : इंग्लंडकडून पहिल्या टेस्टसाठी टीम जाहीर, दोघांचा पत्ता कट, तिघांना पहिल्यांदाच संधी

England vs New Zealand, 1st Test : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे.

ENG vs NZ : इंग्लंडकडून पहिल्या टेस्टसाठी टीम जाहीर, दोघांचा पत्ता कट, तिघांना पहिल्यांदाच संधी
England Cricket Captain Ben Stokes
Image Credit source: PTI
| Updated on: May 13, 2026 | 7:28 PM

इंग्लंड क्रिकेट टीम मायदेशात जून महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत एकूण 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 4 ते 29 जून दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी 13 मे रोजी टीम जाहीर केली आहे. निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेटकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पहिला सामना कधी आणि कुठे?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 4 ते 8 जून दरम्यान लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. निवड समितीने पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर करताना आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. निवड समितीने 2 प्रमुख खेळाडूंना मुख्य संघातून बाहेर ठेवलं आहे.

दोघांना डच्चू, तिघांना पहिल्यांदाच संधी

झॅक क्रॉली आणि ओली पोप या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर रेहान अहमद आणि वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन या दोघांचं कमबॅक झालं आहे. रॉबिन्सन इग्लंड टीममध्ये 2 वर्षांनंतर परतला आहे. तर तिघांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. या तिघांमध्ये एमिलियो गे, सोनी बेकर आणि जेम्स रियूचा समावेश आहे.

रॉबिन्सचं कमबॅक

वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याच्या कमबॅकमुळे इंग्लंड क्रिकेट टीमची ताकद वाढली आहे. रॉबिन्सन आतापर्यंत इंग्लंडसाठी एकूण 20 कसोटी सामने खेळला आहे. ओलीने या 20 सामन्यांत 76 विकेट्स घेतल्या आहेत. रॉबिन्सनने अखेरचा कसोटी सामना हा 2024 साली रांचीत टीम इंडिया विरुद्ध खेळला आहे. त्यानंतर रॉबिन्सनला दुखापतीमुळे 2 वर्ष कसोटी क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं.

जोफ्रा आर्चरचं काय?

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याची पहिल्या कसोटीसाठी निवड करण्यात आलेली नाही. जोफ्राने आपण पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचं आधीच क्रिकेट बोर्डाला सांगितलं होतं.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 4 ते 8 जून, लॉर्ड्स, लंडन.

दुसरा सामना, 17 ते 21 जून, केनिंग्टन ओव्हल, लंडन.

तिसरा आणि अंतिम सामना, 25 ते 29 जून, नॉटिंगघ, ट्रेंटब्रिज.

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट टीम : बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, गस एटकिन्सन, सोनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथल, हॅरी ब्रूक,बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेम्स रियू, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जेमी स्मिथ आणि जॉश टंग.

Follow Us