ENG vs IND : इंडिया-इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी टीम जाहीर, कुणाला संधी?
England vs India 2nd Test : टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी ठरली. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. आता उभयसंघातील दुसऱ्या सामन्याला 2 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात 5 शतकं करुनही पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने लीड्समधील सामना 5 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा बर्मिंघम येथे 2 ते 6 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने टीम जाहीर केली आहे. इंग्लंडने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडने पहिल्या सामन्याआधीची रणनिती दुसऱ्या सामन्यातही वापरली आहे. इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी 6 दिवसांआधीच टीम जाहीर केलीय. तर याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 5 जून रोजी पहिल्या सामन्यासाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला होता. आता इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर केल्याने टीम इंडियाला कोणत्या अर्थाने फायदा झालाय? हे जाणून घेऊयात. इंग्लंडने एकूण 15 खेळाडूंची दुसऱ्या सामन्यासाठी निवड केली आहे. त्यापैकी कोणते 11 खेळाडू खेळू शकतात? टीम इंडिया याचा अंदाज बांधून रणनिती आखू शकते. टीम इंडियाला इंग्लंडने टीम जाहीर केल्याचा असा फायदा होऊ शकतो. आता भारतीय क्रिकेट संघाची भूमिका कशी असणार? हे सामन्यादरम्यानच स्पष्ट होईल.
जोफ्रा आर्चरची एन्ट्री
इंग्लंडने पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसर्या सामन्यासाठी अतिरिक्त एका खेळाडूचा समावेश केला आहे. हा खेळाडू साधासुधा नाही तर मॅचविनर आहे. इंग्लंड टीममध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे इंग्लंडची ताकद दुप्पटीने वाढली आहे. इंग्लंडचे गोलंदाज पहिल्या सामन्यात भारताच्या टॉप 5 फलंदाजंसमोर निष्प्रभ ठरले होते. मात्र आता जोफाच्या कमबॅकमुळे इंग्लंडची ताकद दुप्पटीने वाढली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर
ENGLAND SQUAD FOR THE SECOND TEST AGAINST INDIA:
Stokes, Jofra, Bashir, Bethell, Brook, Carse, Sam Cook, Crawley, Duckett, Overton, Pope, Root, Jamie Smith, Tongue, Woakes. pic.twitter.com/kjPSR5Qdw8
— Johns. (@CricCrazyJohns) June 26, 2025
टीम इंडियासमोर बरोबरी करण्याचं आव्हान
दरम्यान टीम इंडिया या मालिकेत पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. मात्र टीम इंडियाला तसं सहजासहजी करता येणार नाही. त्यामुळे टीम इंडियाची दुसऱ्या सामन्यात चांगलीच ‘कसोटी’ पाहायला मिळणार, इतकं मात्र निश्चित आहे.
दुसर्या टेस्टसाठी इंग्लंड टीम : बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जॅकब बॅथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जॉश टंग आणि क्रिस वोक्स.
