IND vs ENG : इंग्लंडने क्षेत्ररक्षणात टीम इंडियाला फसवलं, सुनील गावस्कर यांचा थेट प्रश्न
भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना उत्कंठा वाढवणाऱ्या वळणावर आला आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या डावाचा खेळ संपला. भारतानेही पहिल्या डावात 387 धावा केल्या. पण या इंग्लंडकडून या डावात रडीचा डाव दिसला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्रंजांनी रडीचा डाव खेळल्याची ओरड होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि या सामन्याचं समालोचन करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे संशयाला फाटे फुटले आहेत. सुनील गावस्कर यांनी इंग्लंडने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर टीका केली. सुनिल गावस्कर म्हणाले की, इंग्लंडने ऋषभ पंतची विकेट घेण्यासाठी लेग साईडला अतिरिक्त क्षेत्ररक्षकाचा वापर केला. कसोटी क्रिकेटमध्ये लेग साईडला जास्तीत जास्त पाच खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकतात. पण इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ऋषभ पंतच्या विकेटसाठी डीप फाईन लेगपासून लाँग ऑनपर्यंत जवळपात 7-8 क्षेत्ररक्षक उभे केले. यामुळे क्रिकेट नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच काय तर वेगवान गोलंदाजांना बाउन्सर आणि शॉर्ट पिच बॉल टाकण्याचे निर्देश दिले होते.
समालोचन करताना सुनिल गावस्कर म्हणाले की, ‘हे जे काही सुरु आहे त्याला क्रिकेट म्हणता येणार नाही. हे क्रिकेटविरुद्ध आहे. लेग साईडला एका वेळी सहापेक्षा जास्त क्षेत्ररक्षक नसावे. आमच्या काळात एका षटकात किती बाउन्स टाकण्याची परवानगी होती? वेस्ट इंडिजचे गोलंदाज या संधीचा फायदा घेत असत. याद्वारे त्यांनी अनेक फलंदाजांना दुखापतही केली आहे.’ इंग्लंडने या प्रकाराची दखल घेतली आणि प्रति षटक बाउन्सरची संख्या 2 पर्यंत कमी केली. आता त्याच इंग्लंडने ऋषभ पंतला शॉर्ट बॉलने लक्ष्य केलं. लेग साईडवर जास्त क्षेत्ररक्षक ठेवू शॉर्ट बॉलचा मारा करणं चुकीचं आहे, असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं.
RUN OUT! 🙌
Ben Stokes aims and fires at the stumps and Rishabh Pant is out! ❌ pic.twitter.com/Z9JWwV9aS4
— England Cricket (@englandcricket) July 12, 2025
सुनील गावस्कर यांनी या प्रकरणात माजी कर्णधार सौरव गांगुली याला लक्ष घालण्यास सांगितलं आहे. गांगुली आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष आहे. ही समिती आयसीसीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियम आणि खेळण्याच्या परिस्थितीत बदल किंवा सुधारणा करण्यासाठी सूचना देते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील समितीने पुढे यावं आणि क्षेत्ररक्षणाच्या नियमांचं पालन करावं, असंही त्यांनी पुढे सांगितलं. दरम्यान, ऋषभ पंत काही त्यांच्या जाळ्यात अडकला नाही. पण धावचीत होत त्याची विकेट सोडली असंच म्हणावं लागेल.
