
क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा अनुभवी आणि दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट टीमेन सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसचे जेम्सनेही भरगच्च पोस्ट लिहीली आहे. जेम्सनने या पोस्टद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच अखेरचा सामना कधी आणि कुठे खेळणार, याबाबतची माहितीही दिली आहे. जेम्स अँडरसनसह क्रिकेटमधील सुवर्ण युगाचा अंत होणार आहे.
जेम्स अँडरसन अखेरचा कसोटी सामना हा जुलै महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध क्रिकेटच्या पंढरीत अर्थात ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये खेळणार आहे. हा सामना 10 ते 14 जुलै दरम्यान पार पडणार आहे. जेम्स अँडरसनने 2003 साली लॉर्ड्समध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. अँडरसनने तेव्हापासून ते आतापर्यंत 187 कसोटी सामन्यांमध्ये 700 विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनने 700 वी विकेट भारत दौऱ्यात धर्मशालेतील कसोटी सामन्यात कुलदीप यादव याला आऊट करत घेतली होती.
“लॉर्ड्समध्ये होणारा पहिला सामना हा माझ्या कसोटी कारकीर्दीतील अखेरचा सामना असणार आहे. क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं जो खेळ लहानपणापासून आवडीचा होता, हे माझ्यासाठी सन्मानजनक आहे. इंग्लंडसाठी खेळणं मी फार मिस करेन. पण मला माहिती आहे की क्रिकेटपासून दूर होण्याची आणि दुसऱ्यांना संधी उपलब्ध करुन देण्याची योग्य वेळ आहे”, असं जेम्सने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
“जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर करताना कुटुंबियांचे जाहीर आभार मानले. घरच्यांच्या पाठिंब्यशिवाय हा प्रवास शक्य नसल्याचं जेम्सने मान्य केलं. तसेच इथवरच्या प्रवासात सहकारी, मार्गदर्शक आणि क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. मी नव्या आव्हानासाठी उत्सूक आहे”, असंही जेम्सने म्हटलं.
जेम्स अँडरसनची सोशल मीडिया पोस्ट
अँडरनस आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 194 वनडे, 19 टी 20 आणि 187 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. जेम्स कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा शेन वॉर्न आणि मुथ्य्या मुरलीधरन यांच्यानंतर तिसरा गोलंदाज आहे. तसेच जेम्सला अखेरच्या सामन्यात 9 विकेट्स घेत शेन वॉर्न याच्या 708 विकेट्सचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचीही संधी आहे.