इंग्लंडने मालिका जिंकली, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत फटका; श्रीलंका अंतिम फेरीच्या शर्यतीत
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी चुरस वाढली आहे. वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात चुरस आहे. पण तिसऱ्या कसोटीतील पराभवामुळे इंग्लंडला फटका बसला आहे.

इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 खिशात घातली. मात्र तिसऱ्या कसोटीतील पराभवामुळे इंग्लंडला मोठा फटका बसला आहे. एकीकडे अंतिम फेरीचं गणित जुळवत असताना पुन्हा पिछेहाट झाली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर होता. 15 पैकी 8 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं होतं. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे 45 विजयी टक्केवारीसह इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानी होता. तसेच अंतिम फेरीचं गणित सुटू शकते अशी स्थिती होती. पण तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेने इंग्लंडला 8 गडी राखून पराभूत केलं आणि सर्वच फिस्कटलं. श्रीलंकेला तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर जबरदस्त फायदा झाला आहे. सातव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा संघ सातव्या स्थानावर होता. सहा पैकी 2 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्याने 33.33 विजयी टक्केवारी होती. पण तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला पराभूत करताच विजयी टक्केवारी 42.86 झाली आहे. त्यामुळे इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेला मागे टाकत पाचवं स्थान मिळवलं आहे.दुसरीकडे, तिसरा कसोटी सामना गमवल्याने इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 45 टक्क्यावरून 42.19 टक्क्यांवर घसरली आहे. त्यामुळे सहाव्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे.
भारतीय संघ 9 कसोटी सामन्यापैकी 6 कसोटीत विजय आणि 2 कसोटीत पराभूत झाला. तसेच एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी असून 68.52 विजयी टक्केवारी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ 50 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा संघ 45.83 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे. दक्षिण अफ्रिका 38.89 टक्क्यांसह सातव्या, पाकिस्तान 19.05 टक्क्यांसह आठव्या आणि वेस्ट इंडिज 18.52 टक्क्यांसह नवव्या स्थानावर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने भारत आणि बांग्लादेश कसोटी महत्त्वाची आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत विजय मिळवण्यात भारताला यश आलं तर पहिलं स्थान अबाधित राहिल. जर काही गडबड झाली तर मग अंतिम फेरीचं गणित खूपच किचकट होईल. त्यामुळे अंतिम फेरीसाठी भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिका काहीही करून 2-0 ने जिंकावी लागणार आहे.
