Air Strike : जेव्हा दहशतवाद.., सचिन तेंडुलकरने एअर स्ट्राईकनंतर पाकला 22 शब्दात सुनावलं

Sachin Tendulkar On Operation Sindhoor : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची 22 शब्दात कानउघडणी केली आहे.

Air Strike : जेव्हा दहशतवाद.., सचिन तेंडुलकरने एअर स्ट्राईकनंतर पाकला 22 शब्दात सुनावलं
Sachin Tendulkar And Lady Police Officers
Image Credit source: PTI
| Updated on: May 07, 2025 | 4:04 PM

भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आणि त्यांच्या नांग्या ठेचल्या. भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 तळं उद्धवस्त केली. भारताच्या या कारवाईत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारताने यासह पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा हिशोब चुकता केला. पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर दहशतीचं वातावरण आहे. तर भारतात पाकड्यांची नांग्या ठेचल्याने जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज सोशल मीडियावरुन भारतीय सैन्य दलाने केलेल्या या कारवाईचं कौतुक करत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्ग्ज फलंदाज सचिन तेंडुलकर याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एअर स्ट्राईकबाबत पोस्ट केली आहे. सचिनने या पोस्टद्वारे 22 शब्दांमधून पाकिस्तानची कानऊघडणी केली आहे. तसेच माजी फलंदाज शिखर धवन आणि टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिकेटच्या 22 यार्डमध्ये अनेक वर्ष खेळलेल्या सचिनने पाकिस्तानला तितक्याच शब्दात मेसेज देत सुनावलंय. सचिनने या पोस्टमधून भारताची ताकद, एकता आणि अखंडता दाखवून दिली आहे. जगात दहशतवादाला थारा नसल्याचं सचिनने म्हटलंय.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

“जेव्हा दहशतवादाचा सामना करावा लागेल तेव्हा आम्ही एक टीम म्हणून उभे राहू. भारताची ताकद अमर्याद आहे. भारताची एकता ही निर्भयतेचा पुरावा आहे. भारताची लोकच ही देशाची ढाल आहे. जय हिंद”, अशा कडक शब्दात सचिनने पाकिस्तानला हा संदेश दिलाय.

शिखर धवनची एक्स पोस्ट

टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन याने काही दिवसांपूर्वी भारताबाबत गरळ ओकणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिदी आफ्रिदी याची लाज काढली होती. धवनने एअर स्ट्राईकनंतर एका वाक्यातच भारतीय सैन्याच्या पराक्रमाबाबत खूप काही म्हटलं आणि दहशतवाद्यांना इशारा दिला. “दहशतवाद पसरवणाऱ्यांविरोधात भारत कारवाई करेल, भारत माता की जय!”, असं धवनने म्हटलंय.

गौतम गंभीर काय म्हणाला?

तसेच टीम इंडियाचा हेड कोच आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर याने पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकसाठी भारतीय सैन्य दलाचं कौतुक केलंय. गंभीरने जय हिंद म्हणत भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा फोटो पोस्ट केला आहे.