
भारत आणि इंग्लंड महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने 4 विकेट राखून जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पण टीम इंडियाच्या गोटात आनंदाचं वातावरण असलं तरी क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे. कारण हरलीन देओलचं धावचीत होणं चर्चेचा विषय ठरला आहे. निष्काळजीपणाची सीमा गाठत तिने आपली विकेट भेट दिली असंच म्हणावं लागेल. अशा पद्धतीने बाद झालेलं पाहून क्रीडाप्रेमींच संताप होणं सहाजिकच आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळताना अशा पद्धतीने बाद होणं म्हणजे गुन्हाच आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 259 धावांचा पाठलाग करताना भारताची पहिली विकेट 48 धावांवर पडली. स्मृती मंधाना 28 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर हरलीन देओल मैदानात उतरली. तिने प्रतिका रावलसोबत 46 धावांची भागीदारी केली. प्रतिका बाद झाल्यानंतर संघ अडचणीत आला होता. त्यामुळे हरलीन देओलसह मधल्या फळीतील फलंदाजांची जबाबदारी वाढली होती. असं असताना हरलीनने स्वत:च्या चुकीची बळी ठरली.
22 व्या षटकात हरलीनने फटका मारला आणि धाव घेतली. खरं तर ही सहज आणि सोपी धाव होती. यात धावचीत होण्याचा प्रश्नच नव्हता. पण हरलीन देओलला निष्काळजीपणा नडला. आरामात क्रिजमध्ये पोहोचली होती. पण तिची बॅट आणि पाय हवेतच होते. एसिल डेव्हिडसन रिचर्ड्सने अचूक थ्रो करत स्टंप उडवले होते. त्यामुळे मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तेव्हा रिप्ले पाहिल्यानंतर बॅट आणि पाय दोन्ही हवेत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे तिला बाद असल्याचं घोषित करण्यात आलं. हरलीन देओल 44 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावा करून बाद झाली.
Foot and bat in the air. 🤯
– One of the most bizzare run outs for India. pic.twitter.com/zAFOnEzhmQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 16, 2025
दरम्यान, इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकात 6 गडी गमवून 258 धावा केल्या आणि विजयासाठी 259 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 48.2 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात विजयाची शिल्पकार ठरली ती दीप्ती शर्मा… दीप्ती शर्माने 64 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 62 धावांची खेळी केली. तसेच 10 षटकं टाकत 58 धावा दिल्या. पण तिला विकेट काही मिळाली नाही.