
वर्ष 2025 संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण हे वर्ष काही जणांसाठी खरंच लकी ठरलं असं म्हणावं लागेल. कारण गेल्या काही वर्षांचा प्रतीक्षेनंतर या वर्षात स्वप्न पूर्ण झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 पर्वानंतर 18व्या पर्वात जेतेपद मिळवलं. गेली अनेक वर्षे आरसीबीचा संघर्ष सुरु होता. दोनदा जेतेपदाच्या अगदी जवळही पोहोचले होते. मात्र पदरी निराशा पडली होती. आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे. दुसरीकडे, असंच काहीसं वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत होबार्ट हरिकेन्स संघाबाबत घडलं होतं. पण दहा वर्षानंतर त्यांना जेतेपदाची चव चाखता आली आहे. वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत होबार्टने पर्थ स्कॉर्चर्सला 8 विकेटने पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत हॉबार्ट हरिकेन्सने पहिल्यांचा जेतेपदाची चव चाखली आहे.
13 डिसेंबर रोजी होबार्टमध्ये वुमन्स बिग बॅश लीगचा अंतिम सामना खेळला गेला. या संपूर्ण पर्वात होबार्टने चांगली कामगिरी केली. तसेच अंतिम फेरीत जागा मिळवली होती. पण जेतेपद मिळेल की हुकेल याबाबत शंका होती. पण यावेळी त्यांना मेहनतीसोबत नशीबानेही साथ दिली. पर्थ स्कॉर्चर्सने अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करत 137 धावा केल्या. तसेच विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. बेथ मूनीच्या 33 आणि कर्णधार सोफी डिवाईनच्या 34 धावांच्या जोरावर पर्थन स्कॉर्चर्सने या धावा केल्या. होबार्टकडून लिन्सी स्मिथ आणि हेदर ग्राहमने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
Your #WBBL11 champions…
Hobart Hurricanes 🏆 pic.twitter.com/SY06Vqyosb
— Weber Women’s Big Bash League (@WBBL) December 13, 2025
होबार्टकडून लिझेल ली आणि डॅनिएल व्याट-हॉज ही जोडी मैदानात उतरली होती. लिझेल लीने आक्रमक सुरुवात केली. दुसरीकडे डॅनिएल संथ गतीने खेळत होती. डॅनिएल 15 चेंडूत 16 धावा करून बाद झाली. लिझेलला नॅट सायव्हर ब्रंटची साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. नॅटने 27 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत 35 धावा केल्या आणि बाद झाली. दुसरीकड लिझेलचा झंझावात सुरुच होता. तिने 44 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 77 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.