IND vs ENG : भारताचा दणदणीत मालिका विजय, मात्र श्रेयसला कसली खंत? म्हणाला…
Shreyas Iyer IND vs ENG 3rd Odi : टीम इंडियाने इंग्लंडला सलग 3 सामन्यात पराभूत करत क्लिन स्वीप केलं. मात्र त्यानंतरही श्रेयस अय्यर याने कशाबाबत खंत व्यक्त केली? जाणून घ्या.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाने या सामन्यात अप्रतिम बॅटिंग आणि बॉलिंग केली. टीम इंडियाने हा सामना हा 142 धावांनी जिंकला आणि इंग्लंडला 3-0 ने क्लिन स्वीप केलं. टीम इंडियाने यासह इंग्लंडला 14 वर्षांनंतर क्लिन स्वीप केलं. भारताच्या या विजयात मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर याचं विशेष योगदान राहिलं. श्रेयसने 64 बॉलमध्ये 78 रन्स केल्या. मात्र या खेळीनंतरही श्रेयसने खंत व्यक्त केली. श्रेयसने विजयानंतर मन मोकळं केलं.
श्रेयसला कसली खंत?
श्रेयसला पोस्ट मॅच प्रझेंटेशनमध्ये अनेक प्रश्नं विचारण्यात आली. श्रेयसला या मालिकेतील कामगिरीबाबत विचारलं. यावर उत्तर देताना श्रेयसने सर्व काही सांगून टाकलं. मी तिसऱ्या सामन्यात चांगला खेळत होतो. शतक करावं अशी माझी इच्छा होती, मात्र तसं झालं नाही. शतक न झाल्याची खंत श्रेयसने व्यक्त केली.
श्रेयस काय म्हणाला?
“आज शतक केलं असतं तर चांगलं राहिलं असतं”, असं श्रेयसने म्हटलं. तसेच श्रेयसला दुसऱ्या सामन्यात नाबाद राहून टीम इंडियाला विजयी करण्याची इच्छा होती. मात्र श्रेयस दुर्देवीरित्या रन आऊट झाला. त्यानंतर श्रेयसने मस्करीत फिल्डर ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात यावा, असं थट्टेत म्हणाला.
मालिकेतील कामगिरीबाबत काय म्हणाला?
टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलग 2 विकेट्स गमावले. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा झटपट आऊट झाले. मात्र त्यानंतर श्रेयस आणि शुबमन या दोघांनी चांगली भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. श्रेयसने याबाबत प्रतिक्रिया दिली. “पहिल्या सामन्यात सलग 2 विकेट्स गेल्यानंतर मी मुमेंटम कायम राखू इच्छित होतो. त्यामुळे मी बॉलच्या मेरीटवर खेळण्याचा प्रयत्न करत होतो. मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसऱ्या सामन्यातही विजयी करुन परतायचं होतं”, असं श्रेयसने म्हटलं.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस एटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड आणि साकिब महमूद.