
टीम इंडियाने शनिवारी 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने 271 धावांचं आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. भारताने या विजयासह मालिका आपल्या नावावर केली. भारताने केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने त्याआधी 3 डिसेंबरला रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर 4 विकेट्सने मात केली होती. भारताला त्या सामन्यात 358 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं होतं. त्या सामन्यात टीम इंडियाकडून एक मोठी चूक झाली होती. त्यामुळे आता आयसीसीने टीम इंडियावर कारवाई केली आहे.
टीम इंडियाला रायपूरमध्ये निर्धारित वेळेत 50 ओव्हर पूर्ण करण्यात अपयश आलं. टीम इंडियाला निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे आयसीसीने टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटमुळे दंडात्मक कारवाई केली आहे. टीम इंडियावर सामन्याच्या एकूण मानधनातील 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागली आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
सामनाधिकारी (Match Referee) रिची रिचर्डसन यांनी टीम इंडियावर ही कारवाई केली. टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात निर्धारित वेळेत 2 ओव्हर टाकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला याबाबत दोषी ठरवण्यात आलं आहे. टीम इंडियाला आयसीसी आचार संहितेच्या अनुच्छेद 2.22 नुसार दोषी ठरवण्यात आलंय.
आयसीसीच्या नियमानुसार, निर्धारित वेळेत 1 ओव्हर कमी टाकल्यास सामन्यातील एकूण मानधनाच्या 5 टक्के रक्कम दंड अशी तरतूद आहे. टीम इंडियाने निर्धारित वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे टीम इंडियाला एका सामन्यातील मानधनाच्या 10 टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसीकडून टीम इंडियाला दणका
India fined for breach of ICC Code of Conduct against South Africa 👀https://t.co/CZO3nv5rcR
— ICC (@ICC) December 8, 2025
कॅप्टन केएल राहुल याने आरोप मान्य केले. तसेच दंड देणार असल्याचं स्वीकार केलं. त्यामुळे या प्रकरणात सुनावणीची गरज पडली नाही.
दरम्यान टीम इंडियाची ओव्हर रेट कायम न राखण्याची ही या मालिकेतील सलग दुसरी वेळ ठरली. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांचीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही ओव्हर रेट कायम ठेवण्यात अपयशी ठरली होती. त्यामुळे टीम इंडियाने आता आगामी टी 20i मालिकेत अशी चुक पुन्हा करु नये, अशीच अपेक्षा भारतीय चाहत्यांना असणार आहे.