
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर आता पाकिस्तान आपला सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तान आपला पहिला सामना यजमान यूएसए विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्याकडे लागलं आहे. हा सामना 9 जून रोजी होणार आहे. मात्र या सामन्याआधी आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे.
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पीसीबी म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तक्रारीनंतर पाकिस्तान टीमचं न्यूयॉर्कमधील हॉटेल बदलला आहे. पाकिस्तान टीमला वर्ल्ड कप दरम्यान हॉटेलपर्यंत पोहचण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागत असल्याची तक्रार करण्यात आली होती. आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.
पीसीबीच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पाकिस्तान टीमला दुसऱ्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. हे नवं हॉटेल स्टेडियमपासून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. पाकिस्तान आपल्या वर्ल्ड कप मोहिमेतील दुसरा सामना हा 9 आणि तिसरा सामना 11 जून रोजी खेळणार आहे. तसेच टीम इंडियाला न्यूयॉर्कमध्ये साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने पहिला सामना जिंकला आहे. आता 2 सामने न्यूयॉर्कमध्ये पार पडणार आहेत. टीम इंडियाचं हॉटेल स्टेडियमपासून 10 मिनिटं अंतरावर आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी आणि उस्मान खान.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.