Samadhan Sarvankar : ‘ते निर्लज्जपणाचं नीचपणाचं…’ दादरमध्ये समाधान सरवणकर यांना भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर, वाद पेटला
प्रभादेवीच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरलं आहे. त्यावर आता भाजपने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या दादर-प्रभादेवी भागातील स्थानिक नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.

मागच्या आठवड्यात मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काही निकाल हे धक्कादायक ठरले आहेत. समाधान सरवणकर यांच्या पराभवावर अजूनही काही जणांना विश्वास बसत नाहीय. काल समाधान सरवणकर यांनी मीडियाशी बोलताना पराभवासाठी भाजपला जबाबदार ठरवलं. त्यांचा रोख दादरमधील स्थानिक नेत्या अक्षता तेंडुलकर यांच्याकडे होता. अक्षता तेंडुलकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “समाधान सरवणकरांचे आरोप बिनबुडाचे आहेत. भाजपने मन लावून काम केलय. शिवसेनेकडे इथे वोट बँक नाहीये. 2017 चे आकडे काढा कळेल. समाधान हरल्यानंतर खापर भाजपवर फोडतोय. बालीश वक्तव्य आहे. माईक आम्ही हॅंडल केले. त्यांना पूर्ण सहकार्य केलं” असं अक्षता तेंडुलकर म्हणाल्या.
“बूथ नुसार आकडे पाहा, इथे 191 मध्ये प्रिया सरवणकर गुरव यांना भाजपची सगळी मतं पडली. विशाखा राऊत यांच्याकडे ही मत वळली नाहीत. पण आगरबाजारच्या पुढे त्यांना शिवसेनेची मतं पडली नाहीत. भाजपवर खापर फोडू नका. समाधानला विनंती आहे की त्याने हे आकडे घेऊन जावे आणि अभ्यास करावा” असं थेट उत्तर अक्षता तेंडुलकर यांनी दिलं.
यांच्या घरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय आत्ता भांडी घासायची का?
“त्यांचे फेसबूक, इंस्टाग्राम पाहा. प्रकाश पाटणकर मानतात की भाजपने काम केलं. हे दोन्ही भाऊ-बहिण मानत नाहीत. यांच्या घरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय आत्ता भांडी घासायची का?” अशा शब्दात अक्षता तेंडुलकर यांनी हल्लाबोल केला. “स्वतः काहींनी व्हॉ्टस ऐप मेसेज ड्राफ्ट केले आहेत. त्यांच्या विरोधात मी स्वतःहा तक्रार करणार आहे. खोटं बोला पण रेटून बोला. तुमच्या मनासारखं झालं नाही की भीजपवर खापर फोडा” अशी टीका अक्षता तेंडुलकर यांनी केली.
अपमान करण्यासाठी काहीही बोलणार तर चालणार नाही
“फडणवीस यांच्याबाबत समाधान सरवणकर यांनी जे वक्तव्य केलं ते निर्लज्जपणाचं नीचपणाचं वक्तव्य आहे. त्यांना पाहून आम्ही राजकारण करतोय. अपमान करण्यासाठी काहीही बोलणार तर चालणार नाही. यांच्याकडे पक्ष शिस्त नाही. दादरमध्ये भाजपला जागा दिली असती तर 200 टक्के जागा भाजप जिंकली असती” असं अक्षता तेंडुलकर म्हणाल्या.
भाजपमध्ये राहून विरोधकांची B टीम
“भाजपच्या लोकांनी आमच्यासाठी कामं केली आहेत. पण एक टोळी आहे, त्यांनी महायुतीसाठी काम केलं नाही. भाजपच्या लोकांमध्ये राहून हे लोक काम करत आहेत. ही भाजपमध्ये राहून विरोधकांची B टीम म्हणून काम करत आहे. या लोकांनी महायुतीसाठी काम केलं नाही. त्यांची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे करणार आहे. आज साटम यांनी देखील सांगितलं की, जी लोकं आहेत त्यांच्या विरोधात चौकशी करू” असं समाधान सरवणकर म्हणाले.
“यात आता काय कारवाई करणार हे बघणार. पण ह्या लोकांना तक्रार करु देत. आमच्याकडे देखील पुरावे आहेत. ह्या लोकांचे काही आर्थिक व्यवहार झाले असतील म्हणून ते असे वागले असतील. पण त्यांनी या आधी विधानसभा आणि लोकसभेला देखील तसच विरोधात काम केलं. आता तक्रार केली तर पोलिसांनाच सगळं cdr मध्ये काय आहेत ते कळेल” असं समाधान सरवणकर म्हणाले.
