INDW vs AUSW : भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना पावसामुळे रद्द झाल्यास उपांत्य फेरीचं तिकीट कुणाला? जाणून घ्या
Icc Womens T20 World Cup Semifinal Scenario: आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे ए ग्रुपमधून उपांत्य फेरीत पोहचणारे 2 संघ कोणते असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 28 जून रोजी टीम इंडियाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. टीम इंडियासमोर साखळी फेरीतील आपल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. बी ग्रुपमधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. मात्र ए ग्रुपमधील गुंता अजूनही कायम आहे.
ए ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारे 2 संघ कोणते असणार हे आज रविवारी 28 जून रोजी जवळपास स्पष्ट होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला स्वत:च्या जोरावर उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास कुणाला फायदा होणार? हे आपण जाणून घेऊयात.
ए ग्रुपमध्ये कोण कुठे?
ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. टीम इंडियाने 4 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेनेही भारताप्रमाणे 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. मात्र समान गुण असूनही नेट रनरेट चांगला असल्याने टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे. ए ग्रुपमधून पाकिस्तान आणि नेदरलँड्सचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. त्यामुळे 2 जागांसाठी 4 संघांमध्ये चुरस आहे. मात्र ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या तिघांमध्ये 2 जागांसाठी मुख्य लढत आहे.
त्यामुळे टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात येईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 9 आणि भारताचे 7 गुण होतील. ऑस्ट्रेलिया 9 पॉइंट्ससह ए ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरेल.
भारताचं समीकरण
तसेच दक्षिण आफ्रिकेने आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर मात केली तर त्यांचे 8 गुण होतील. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचेल. तर 7 गुणांमुळे भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मात्र 7 गुणांचं समीकरण हे पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे सामना रद्द झाल्यास लागू होईल. तसेच बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास भारताची उपांत्य फेरीची संधी वाढेल. त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी व्हावं. तसेच बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचेल. त्यामुळे आता भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.