IND vs AUS : श्रेयसच्या नेतृत्वात इंडियाचा फायनलमध्ये 2 विकेट्सने विजय, कांगारुंना लोळवत मालिका जिंकली
India A vs Australia A 3rd unofficial ODI Match Result : इंडिया ए ने ऑस्ट्रेलिया ए चा रंगतदार झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 2 विकेट्सने धुव्वा उडवत मालिका आपल्या नावावर केली आहे. प्रभसिमरन सिंह हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

इंडिया ए टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात रंगतदार झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया ए संघावर 2 विकेट्सने मात केली आहे. टीम इंडियाने यासह 3 मॅचची अनऑफीशियल वनडे सीरिज 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 318 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 2 विकेट्स राखून आणि 24 चेंडूंआधी पूर्ण केलं. भारताने 46 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 322 धावा केल्या. प्रभसिमरन सिंग हा टीम इंडियाच्या विजयाच्या हिरो ठरला. तर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि रियान पराग या दोघांनीही अर्धशतकं करत निर्णायक भूमिका बजावली. तर इतरांनीही योगदान दिलं.
भारताने असा जिंकला सामना
अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 83 रन्सची पार्टनरशीप केली. भारताने अभिषेक शर्माच्या रुपात पहिली विकेट गमावली. अभिषेक सलग दुसऱ्या सामन्यात काही खास करु शकला नाही. अभिषेक 22 धावांवर बाद झाला. तिलक वर्मा याला मोठी खेळी करुन हिरो होण्याची संधी होती. मात्र तिलकने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
त्यानंतर प्रभसिमरन सिंह आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 56 रन्स जोडल्या. या दरम्यान प्रभने खणखणीत शतक ठोकलं. मात्र प्रभ शतकी खेळीत 2 धावा जोडून मैदानाबाहेर गेला. प्रभने 68 चेंडूत 7 सिक्स आणि 8 फोरसह 102 रन्सची स्फोटक खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.
चौथ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी
प्रभच्या रुपात भारताने 145 धावांवर तिसरी विकेट गमावली. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रियान पराग या जोडीने निर्णायक क्षणी शतकी भागीदारी केली. या भागीदारीमुळे सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 117 रन्सची पार्टनरशीप केली.
39 धावांच्या मोबदल्यात 5 झटके
श्रेयसने 58 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 62 रन्स केल्या. त्यामुळे भारताचा स्कोअर 34.3 ओव्हरमध्ये 262 रन्सवर 4 आऊट असा झाला. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलिया सामन्यात कायम होती. ऑस्ट्रेलियाने श्रेयसला बाद करत सामन्यात कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने भारताला 39 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले. त्यामुळे भारताची स्थिती 43.5 ओव्हरमध्ये 8 आऊट 301 अशी झाली.
रियान पराग याने 62, निशांत सिंधू 2, आयुष बदोनीने 21 रन्स केल्या. तर हर्षित राणा भोपळाही फोडू शकला नाही. भारताने 8 विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया हातातला सामना गमावते की काय? असंच वाटत होतं. मात्र अखेरच्या क्षणी विपराज निगम आणि अर्शदीप सिंह या जोडीने संयमीपणे कांगारुंच्या गोलंदाजांचा सामना केला. विपराजने नाबाद 24 आणि अर्शदीपने 7 धावा केल्या. दोघांनी नवव्या विकेटसाठी नॉट आऊट 21 रन्सची पार्टनरशीप केली आणि टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. भारताने अशाप्रकारे या सामन्यासह मालिका जिंकली.
