IND A vs OMAN : टीम इंडिया-ओमानमध्ये सेमी फायनलसाठी टफ फाईट, दोघांसाठी करो-मरो सामना, वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष
Emerging Asia Cup 2025 India A vs Oman Live Streaming : ओमान आणि इंडिया ए या दोन्ही संघांची या स्पर्धेतील सारखीच कामगिरी राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी साखळी फेरीतील त्यांचा शेवटचा सामना करो या मरो असा आहे.

कुवेतची राजधानी दोहा इथे एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप 2025 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ खेळत आहेत. स्पर्धेतील 10 व्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. मंगळवारी 18 नोव्हेंबरला टीम इंडिया ए विरुद्ध ओमान भिडणार आहेत. बी ग्रुपमधून पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. यूएईने साखळी फेरीतील 3 पैकी सलग 2 सामने जिंकले आहेत. यूएईचं यासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे बी ग्रुपमधून उपांत्य फेरीतील एकमेव जागेसाठी ओमान आणि इंडिया ए यांच्यात थेट सामना आहे.
दोन्ही संघ मंगळवारी साखळी फेरीतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांनी 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर 1 सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे भारत ए विरुद्ध ओमान यांच्यातील विजेता संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवेल हे निश्चित आहे. ओमानच्या तुलनेत भारताचा अ संघ कित्येक पटीने भक्कम आहे. त्यामुळे भारताच्या जिंकण्याची शक्यता अधिक आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. त्यामुळे ओमानला गृहीत धरण्याची इंडिया ए टीम चूक करणार नाही.
अमरावतीकर जितेश शर्मा या स्पर्धेत इंडिया ए चं नेतृ्व करत आहे. तर हम्माद मिर्झा याच्याकडे ओमानच्या नेतृत्वाची धुरा आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.
इंडिया ए विरुद्ध ओमान सामना कधी?
इंडिया ए विरुद्ध ओमान सामना मंगळवारी 18 नोव्हेंबरला होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध ओमान सामना कुठे?
इंडिया ए विरुद्ध ओमान सामना वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दोहा इथे होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध ओमान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंडिया ए विरुद्ध ओमान सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील एपवर पाहायला मिळेल.
इंडिया ए विरुद्ध ओमान सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
इंडिया ए विरुद्ध ओमान सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष
दरम्यान वैभव सूर्यवंशी याने या स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यात कडक कामगिरी केली आहे. वैभवने यूएई विरुद्ध 144 तर पाकिस्तान विरुद्ध 45 धावा केल्या होत्या. त्यामुळे वैभव ओमान विरुद्ध किती धावा करतो? याकडे सर्वांचीच करडी नजर असणार आहे.
