
टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात एडलेड ओव्हलमधील दुसर्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला मालिका विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. या आर पारच्या लढाईत भारताने 9 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 264 धावा केल्या. टीम इंडियाला 250 पार पोहचवण्यात रोहित शर्मा याने प्रमुख भूमिका बजावली. तर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या चौघांनीही बॅटिंगने निर्णायक योगदान दिलं. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात की ऑस्ट्रेलिया सामन्यासह मालिका जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या कॅप्टन शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने संथ सुरुवात केली. या दोघांनी 6 ओव्हरमध्ये 17 धावा केल्या. मात्र झेव्हीयर बार्टलेट याने टीम इंडियाला 7 व्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. बार्टलेटने शुबमन आणि विराट कोहली या दोघांना एकाच ओव्हरमध्ये मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शुबमनने 9 धावा केल्या. तर विराट कोहली याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 2 आऊट 17 अशा झाला.
विराटनंतर आलेल्या श्रेयसने रोहितला अप्रतिम साथ दिली. रोहित आणि श्रेयसने तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. भारताने रोहितच्या रुपात तिसरी विकेट गमावली. रोहितने सर्वाधिक 73 धावा केल्या. श्रेयस आणि अक्षर पटेल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 25 रन्स केल्या. त्यानंतर श्रेयसही माघारी परतला. श्रेयसने 61 धावा केल्या. श्रेयसचं उपकर्णधार म्हणून हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.
अक्षर पटेल आणि केएल राहुल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 14 धावा जोडल्या. केएल 11 धावांवर माघारी परतला. त्यानंतर अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. वॉशिंग्टनने 12 धावा केल्या.
अक्षर संधी मिळेल तशी फटकेबाजी करत होता. अक्षर अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र अक्षर निर्णायक क्षणी आऊट झाला. अक्षरने 41 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. नितीश कुमार रेड्डी 8 धावांवर बाद झाला.
त्यानंतर हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या जोडीने कमाल केली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांची धुलाई करत नवव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. या दोघांनी 29 बॉलमध्ये 39 रन्सची पार्टनरशीप केली. अर्शदीपने 13 रन्स केल्या. हर्षित राणा याने नाबाद 24 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी एडम झॅम्पा याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. झेव्हियर बार्टलेट या तिघांना आऊट केलं. तर मिचेल स्टार्कच्या खात्यात 2 विकेट्स गेल्या.