शतकी खेळीनंतर रोहित शर्माने सांगितलं डोक्यात नेमकं काय सुरु होतं? ‘मी आधीच…’
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माच्या बॅटला अखेर धार लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची बॅट बोथट झाल्याची टीका होत होती. पण इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. शतकी खेळीसह टीम इंडियाला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला.

भारताने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. भारताने या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला आणि मालिका आपल्या पारड्यात खेचली. खरं तर या मालिकेत सामना विजयापेक्षा खेळाडूंचा फॉर्म महत्त्वाचा होता. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने खेळाडूंचं फॉर्ममध्ये असणं गरजेचं होतं. खासकरून कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या रोहित शर्माचा फॉर्म महत्त्वाचा होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॉर्मवरून बराच गदारोळ माजला होता. पहिल्या वनडे सामन्यातही फक्त 2 धावा करून बाद झाला होता. त्यामुळे रोहित शर्माला फॉर्ममध्ये परतण्यास वेळ लागेल असं वाटत होतं. पण रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यातच आपल्या फलंदाजीची कसर भरून काढली. टीम इंडियाला इंग्लंडने विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान आघाडीच्या फलंदाजांच्या खेळीशिवाय शक्य नव्हतं. त्यामुळे एकाला कोणाला तरी शतकी खेळी करावी लागेल असं समालोचक सांगत होते. ही जबाबदारी कर्णधार रोहित शर्माने योग्य रितीने पार पाडली. रोहित शर्माने 90 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. या खेळीसह त्याने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. यावेळी त्याने शतकी खेळीमागचं गुपित उघड केलं.
रोहित शर्माने सांगितलं की, ‘संघासाठी मी धावा केल्या याचा मला आनंद आहे. महत्त्वाचा सामना होता आणि यात मी फलंदाजी कशी करायचे टप्पे निश्चित केले होते. हा प्रकार टी20 पेक्षा मोठा आणि कसोटीपेक्षा छोटा आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागते. मी लक्ष केंद्रीत केलं आणि जितकी खोल खेळी करता येईल याचा प्रयत्न ठेवला. काळ्या खेळपट्टीवर बॉल स्कीड होतो त्यामुळे पूर्ण बॅट दाखवूनच खेळावं लागतं. ते प्लानिंगनुसार माझ्या शरीराच्या आसपास गोलंदाजी करत होते. पण मीही त्या प्लानसाठी तयार होतो. मी गॅप शोधले आणि फटकेबाजी केली. यावेळी मला शुबमन गिलची चांगली मदत झाली.’
‘मधल्या षटकांमध्ये खेळाची बाजू कुठेही घसरू शकते. त्यामुळे मधल्या षटकात चांगली फलंदाजी आवश्यक आहे. यामुळे डेथ ओव्हरमध्ये चिंता करण्याची गरज भासत नाही. नागपूर आणि कटकमध्येही आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. यामुळे विरोधकांवर दबाव वाढला. मी गेल्या सामन्यानंतरही म्हटले होते की, आम्हाला एक संघ म्हणून आणि खेळाडू म्हणून चांगले व्हायचे आहे. खेळाडूंना काय करायचे हे स्पष्ट असेल तर चिंता करण्याचं कारण नाही. कर्णधार आणि प्रशिक्षक जे काही म्हणत आहेत ते जर त्यांनी अंमलात आणले तर विचार करण्यासारखे काही नाही.’