25 चौकार आणि षटकार..! वैभव सूर्यवंशी आणि टीम इंडियाचा कर्णधाराची जुगलबंदी, इंग्लंडमध्ये वादळ घोंघावणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर 19 वनडे मालिका सुरु हगोणार आहे. या मालिकेतील पहिला सामना होवमध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी आक्रमक खेळी करण्यास सज्ज आहेत.

25 चौकार आणि षटकार..! वैभव सूर्यवंशी आणि टीम इंडियाचा कर्णधाराची जुगलबंदी, इंग्लंडमध्ये वादळ घोंघावणार
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे
Image Credit source: PTI/ACC/X
| Updated on: Jun 26, 2025 | 2:59 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होत आहे. अंडर 19 वनडे मालिका 27 जूनपासून सुरु होणार आहे. पहिला सामना होव मैदानात दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. मालिका सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अंडर 19 वनडे संघाची धुरा आयुष म्हात्रेच्या खांद्यावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी हे खेळाडू ओपनिंगला उतरतात. या जोडीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या दोघांची आक्रमक खेळी पाहून इंग्लंडच्या अंडर 19 संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण या मालिकेपूर्वी आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी तीन सामन्यात ओपनिंग केली आहे. यावेळी या दोघांनी 81 चेंडूत 123 धावांची खेळी केली आहे. यात 25 चौकार आणि षटकार मारले आहेत. वैभव सूर्यवंशीने 5 षटकार आणि 8 चौकार मारले आहेत. तर आयुष म्हात्रेने 12 चौकार मारले आहेत. ही जोडी आता चौथ्यांदा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच धरतीवर दोघांची खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदाच वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ही जोडी आशियाबाहेर ओपनिंग करणार आहे. यापूर्वी खेळलेल्या तीन सामन्यात युएईमध्ये ही जोडी खेळली होती. यात बांग्लादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध ओपनिंग केली होती. म्हणजेच पहिल्यांदाच ही जोडी आशिया बाहेरील संघाविरुद्ध ओपनिंगला उतरणार आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण ही जोडी किती आणि कशा धावा करते यावर पुढचं गणित ठरणार आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये शतक ठोकलं होतं. त्यामुळे त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असणार आहेत. दुसरीकडे, इंग्लंडला कमी समजून चालणार नाही.

भारत आणि इंग्लंड अंडर 19 वनडे मालिकेतील पहिला सामना 27 जूनला, दुसरा सामना 30 जूनला, तिसरा सामना 2 जुलैला, चौथा सामना 5 जुलैला आणि शेवटचा सामना 7 जुलैला होणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान असेल. तर दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 23 जुलै दरम्यान असणार आहे.

Follow Us