
टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्च रोजी इंग्लंडवर मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाला 253 धावा करुनही इंग्लंडने चांगला घाम फोडला. इंग्लंडने 254 धावांचा पाठलाग करताना कडवी झुंज दिली. जेकब बेथल याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंड हा सामना जिंकेल असं चित्र होतं. मात्र भारतीय खेळाडूंनी निर्णायक क्षणी चिवट बॉलिंग आणि दमदार फिल्डिंग केली. त्यामुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. भारताने अशाप्रकारे हा सामना 7 धावांनी जिंकत अंतिम फेरीत धडक दिली. टीम इंडियाची फायनलमध्ये पोहचण्याची या स्पर्धेच्या इतिहासातील सलग दुसरी तर एकूण चौथी वेळ ठरली.
संजू सॅमसन याने विजयात प्रमुख योगदान दिलं. संजूने अवघ्या 42 बॉलमध्ये 89 रन्स केल्या. संजूने मिळवून दिलेल्या स्फोटक सुरुवातीमुळे भारताला 20 ओव्हरमध्ये 253 धावांपर्यंत पोहचता आलं. संजूच्या या खेळीचं महत्त्व लक्षात घेत त्याला सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं. संजूने पुरस्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त केलं. संजूने या वेळेस मनाचा मोठेपणा दाखवत यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला या विजयाचं श्रेय दिलं. संजू बुमराबाबत काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
इंग्लंडने विजयी धावांचा पाठलाग करताना अखेरच्या क्षणी आणखी वेगात टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. जेकब बेथल याने एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली. त्यामुळे हा सामना टीम इंडियाच्या हातातून निसटत असल्याचं वाटत होतं. मात्र बुमराहने आपल्या धारदार आणि चिवट बॉलिंगच्या जोरावर सामन्यावर नियंत्रण मिळवलं. बुमराहने त्याच्या कोट्यातील 4 ओव्हरमध्ये 32 धावा देत 1 विकेट मिळवली. तसेच भारतीय क्रिकेट संघाला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच संजूने बुमराहला त्याने निर्णायक क्षणी केलेल्या भेदक गोलंदाजीसाठी विजयाचं श्रेय दिलं.
“विजयी होऊन फार चांगलं वाटत आहे. गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. तेच सातत्य आताही कायम राखण्याचा प्रयत्न केला. मी स्वत:ला थोडा वेळ दिला. त्यानंतर बॅटवर बॉल येऊ लागला. मला मोठी खेळी खेळायची होती. आम्ही स्थिती पाहिली. तसेच यशस्वी ठरलो यासाठी चांगलं वाटतंय”, असं संजूने नमूद केलं.
“जसप्रीत बुमराह याला या विजयाचं संपूर्ण श्रेय जातं. त्याने चांगली बॉलिंग केली नसती तर मी इथे कदाचित उभा नसतो. मी सुद्धा या विजयात योगदान दिलं, त्यासाठी फार आनंदी आहे”, असं म्हणत संजूने बुमराहला विजयाचं श्रेयस दिलं तसेच स्वत:च्या खेळीचाही त्याने आवर्जून उल्लेख केला.