
भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात घरच्या मैदानात यूएसएला लोळवत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने 7 फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यूएसएवर मात केली. भारताचा हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सलग नववा विजय ठरला. आता टीम इंडियासमोर आपल्या साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. गेरहार्ड इरास्मस हा या सामन्यात नामिबियाचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. भारत विरुद्ध नामिबिया हा सामना कधी आणि कुठे होणार? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना गुरुवारी 12 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल/लॅपटॉप/टीव्हीव लाईव्ह पाहता येईल.
भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांची वर्ल्ड कप स्पर्धेतील या सामन्यानिमित्ताने आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी दोन्ही संघांत पहिला टी 20i सामना हा 2021 मधील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळवण्यात आला होता. भारताने तेव्हा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात नामिबियावर एकतर्फी फरकाने मात केली होती. भारताने नामिबियाला 9 विकेट्सने पराभूत केलं होतं.
दरम्यान टीम इंडियाने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 4 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 2 सामने जिंकलेत, तर तितक्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. आता गुरुवारी होणाऱ्या सामन्यात ब्लु आर्मी नामिबिया विरुद्ध किती मोठ्या फरकाने सामना जिंकणार? याचीच प्रतिक्षा चाहत्यांना आहे.