
न्यूझीलंड क्रिकेट टीमने रायपूरमध्ये भारतासमोर दुसर्या टी 20i सामन्यात 200 पार मजल मारली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 209 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 6 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी मिडल ऑर्डरमध्ये रचीन रवींद्र याने 44 धावांची खेळी केली. तर कर्णधार मिचेल सँटनर याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. सँटनर याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सँटनरने नाबाद 47 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 200 पार पोहचता आलं. सँटनरने दिलेल्या फिनिशिंग टचमुळे न्यूझीलंडला भारतासमोर 209 धावांचं हे आव्हान ठेवता आलंय. आता टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करत नागपूरनंतर रायपूरमध्ये विजयी होत सलग दुसरा सामना जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या सलामी जोडीने न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी स्फोटक बॅटिंग करत न्यूझीलंडला 43 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र त्यानंतर भारताने न्यूझीलंडला सलग 2 षटकांत झटके देत जोरदार कमबॅक केलं. हर्षित राणा याने डेव्हॉन कॉनव्हे याला आऊट केलं आणि ही जोडी फोडली. हर्षितची कॉनव्हेला आऊट करण्याची ही चौथी वेळ ठरली. कॉनव्हेने 19 धावा केल्या. तर वरुण चक्रवर्ती याने टीम सायफर्ट याला 24 धावांवर इशान किशन याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे न्यूझीलंडची 43-0 वरुन 43-2 अशी स्थिती झाली.
भारताने झटपट 2 झटके दिल्यानंतर रचीन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 27 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ग्लेन फिलिप्स 19 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी अनुक्रमे 27, 4 आणि 32 धावांची भागीदारी केली. डॅरेल मिचेल 18, रचीन रवींद्र 44 आणि मार्क चॅपमॅन याने 10 धावा केल्या. चॅपमॅन आऊट झाल्याने न्यूझीलंडचा स्कोअर 16.5 ओव्हरमध्ये 6 आऊट 161 झाला होता.
त्यानंतर मिचेल सँटनर आणि झॅकरी फॉल्क्स या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद आणि निर्णायक भागीदारी केली. या दोघांनी 19 बॉलमध्ये नॉट आऊट 47 रन्सची पार्टनरशीप केली. सँटनरने नाबाद 47 आणि झॅकरीने 15 धावा केल्या. तर टीम इंडियासाठी कुलदीप यादव याने 2 विकेट्स मिळवल्या. तर चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.