IND vs PAK: ‘6 चेंडूत विजयासाठी 15 धावांची गरज असती तर….’ हार्दिकच महत्त्वाचं विधान
IND vs PAK: पहिल्याच सामन्यात पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (IND vs PAK) धूळ चारली. या विजयामध्ये ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) रोल महत्त्वाचा होता.

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (IND vs PAK) धूळ चारली. या विजयामध्ये ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) रोल महत्त्वाचा होता. 17 चेंडूत त्याने फटकावलेल्या नाबाद 33 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. यात चार चौकार आणि एक षटकार आहे. हार्दिकने 19 व्या षटकात सामना भारताच्या बाजूने फिरवला. या ओव्हर मध्ये त्याने तीन चौकार मारले. त्यानंतर लास्ट ओव्हर मध्य 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होती. हार्दिकने थेट षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यादरम्यान एक चित्र पहायला मिळालं, ज्यात हार्दिकचा आत्मविश्वास दिसून आला. मोहम्मद नवाज शेवटची ओव्हर टाकत होता. त्याने पहिल्या चेंडूवर रवींद्र जाडेजाला क्लीन बोल्ड केलं. दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर आलेल्या कार्तिकने एक धाव घेतली.
एक महत्त्वपूर्ण विधान
समोर हार्दिक पंड्या होता. त्याने तिसरा चेंडू निर्धाव खेळून काढला. सामना रोमांचक वळणार होता. त्यामुळे टेन्शन येणं स्वाभाविक आहे. त्यावेळी हार्दिकने दिनेश कार्तिकडे पाहून निर्धास्त रहा असा इशारा केला. त्यानंतर हार्दिकने थेट षटकार ठोकला. सामना संपल्यानंतर हार्दिकने निर्धास्त रहा जे सांगितलं, तो व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यातून त्याचा आत्मविश्वास दिसून आला. सामना संपल्यानंतर हार्दिकने एक महत्त्वपूर्ण विधान केलं. अंतिम षटकात भारताला विजयासाठी 6 चेंडूत 15 धावांची आवश्यकता असती, तर त्या धावा मी केल्या असत्या, असं हार्दिक म्हणाला.
हार्दिकचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला. आधी गोलंदाजी नंतर फलंदाजीमध्ये आपली क्षमता दाखवून दिली. हार्दिकने 4 षटकात 25 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. त्यानंतर 17 चेंडूत नाबाद 33 धावा फटकावल्या.
मी स्वत:ला तयार ठेवलं असतं
पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हार्दिक म्हणाला की, “ज्या पद्धतीने आम्ही लक्ष्याचा पाठलाग केला, त्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये प्लानिंग कराव लागतं” “पाकिस्तानच्या कुठल्या गोलंदाजाची षटक बाकी आहेत, ते मला सुरुवातीपासून माहित होतं. शेवटच्या षटकात आम्हाला विजयासाठी 7 धावा बनवायच्या होत्या. पण त्याऐवजी 15 धावा असत्या, तरी मी स्वत:ला तयार ठेवलं असतं. कारण मला माहित होतं, 20 व्या षटकात माझ्यापेक्षा गोलंदाजावर जास्त दबाव असेल” असं हार्दिक म्हणाला.
