IND vs PAK : जय शाह-शाहिद आफ्रीदीने एकत्र इंडिया-पाकिस्तान सामना पाहिला? जाणून घ्या खरं काय?
Jay Shah And Shahid Afridi Viral Video Fact Check : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात झालेल्या भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. हा सामना जय शाह, अनुराग ठाकुर आणि शाहिद आफ्रिदी या तिघांनी एकत्र बसून पाहिला? जाणून घ्या.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 14 सप्टेंबरला पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही देशाचे क्रिकेट संघ आमनेसामने आले होते. या हल्ल्यानंतरही हा सामना होत असल्याने देशवासियांचा तीव्र विरोध होता. मात्र त्यानंतरही सामना झाला आणि भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय साकारला. भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवत सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हीडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हीडिओबाबत अनेक दावे केले जात आहेत.
नक्की दावा काय?
आयसीसी अध्यक्ष जय शाह, मंत्री अनुराग ठाकुर आणि पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदी या तिघांनी स्टेडियममध्ये एकमेकांच्या शेजारी बसून आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना पाहिल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हीडिओत जय शाह, अनुराग ठाकुर आणि शाहिद आफ्रिदी चर्चा करताना दिसत आहेत. मात्र हा व्हीडिओ किती खरा आहे? व्हीडिओत दिसत असलेले ते तिघे जय शाह, अनुराग ठाकुर आणि शाहिद आफ्रिदी हेच आहेत का? हे आपण जाणून घेऊयात.
नक्की खरं काय?
व्हायरल व्हीडिओत जय शाह, अनुराग ठाकुर आणि शाहिद आफ्रिदी एकत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खरा आहे. तसेच या तिघांनी एकत्र बसून भारत-पाकिस्तान सामना पाहिला हे देखील खरं आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना आशिया कप 2025 स्पर्धेतील नाही. भारत-पाकिस्तान सामन्याचा जुना व्हीडिओ सोशल मीडियावर आशिया कप स्पर्धेतील असल्याचा सांगून पसरवला जात आहे.
व्हायरल व्हीडिओचं सत्य काय?
सोशल मीडियावर कायमच काही गोष्टी खोट्या दाव्यांसह जाणीवपूर्वक पसरवल्या जातात. अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल होणार्या पोस्ट, व्हीडिओ तसेच फोटोची सत्यता जाणून न घेता परस्पर फॉरवर्ड करतात. त्यामुळे व्हायरल होणारी संबंधित पोस्ट खरी वाटू लागते. त्यामुळे खोटंच खरं असल्याचा अनेकांचा समज होतो.
व्हायरल व्हीडिओ केव्हाचा?
Anurag Thakur, Jay Shah, and Shahid Afridi are in the stadium watching the India Pakistan match like high school friends. But some twitter patriots wants to boycott the game vs Pakistan 😀 #INDvPAK #AsiaCup pic.twitter.com/T7gB1CqkC7
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) September 14, 2025
व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओच्या सुरुवातीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे होर्डिंग्स दिसत आहेत. त्यामुळे हा व्हीडिओ आशिया कपमधील नसून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे जय शाह-अनुराग ठाकुर आणि शाहिद आफ्रिदी या तिघांनी एकमेकांसह आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना पाहिल्याचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट होतं.
दरम्यान अवघ्या काही महिन्यांपूर्वी टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. या स्पर्धेतील एका सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. उभयसंघात 23 फेब्रुवारी 2025 रोजी हा सामना खेळवण्यात आला होता. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता.
