
टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने आयर्लंडला 8 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 97 धावांचं आव्हान हे 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. कॅप्टन रोहितने टीम इंडियाकडून सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर ऋषभ पंत याने नाबाद 36 धावा केल्या. मात्र सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली हे दोघे अपयशी ठरले. सूर्याने 2 धावा केल्या. तर विराट अवघी 1 रन करुन मैदानाबाहेर गेला.
विराटच्या या कामगिरीनतंर आणि आगामी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबाबत लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विराट आयर्लंड विरुद्ध अपयशी ठरला. मात्र तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात धमाका करेल, अशी आशा गावस्कर यांनी व्यक्त केली. टीम इंडियाच्या माजी कर्णधाराकडून गावस्कर यांना बाबर आझमच्या संघाविरुद्ध मोठ्या खेळीची आशा आहे.
” स्टीव्हन स्मिथ, विराट कोहली, बाबर आझम आणि जो रुट या सारखे खेळाडू जेव्हा एखा सामन्यात अयशस्वी ठरतात, तेव्हा ते पुढील सामन्यात त्याची संपूर्ण भरपाई करु इच्छितात. ते दुप्पट धावा करु इच्छितात. विराटने आयर्लंड विरुद्ध जितक्या धावा केल्या नसतील त्याच्या दुप्पट धावा विराट पाकिस्तान विरुद्ध करेल. यापेक्षा चांगलं काय असू शकतं”, असं गावस्कर स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करताना म्हणाले.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला हा रविवारी 9 जून रोजी होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. त्यामुळे या सामन्यातही टीम इंडियाकडून पाकिस्तान विरुद्ध जोरदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी आणि उस्मान खान.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.