
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील 21 व्या सामन्यात शुक्रवारी 13 फेब्रुवारीला ए ग्रुपमधील यूएसए विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. यूएसएने या सामन्यात नेदरलँड्सवर एकतर्फी विजय मिळवला. यूएसएने नेदरलँड्सला 197 धावांचा पाठलाग करताना 25 बॉलआधी गुंडाळलं. यूएसएने नेदरलँड्सला 15.5 ओव्हरमध्ये 103 रन्सवर ऑलआऊट केलं. यूएसएने यासह 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. यूएसएच्या या विजयाचा ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये मोठा परिणाम झाला आहे.
यूएसएने सामना जिंकण्यासह नेदरलँड्सला सलग दुसरा विजय मिळवण्यापासून रोखलं. यूएसएने यासह ए ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमध्ये नेदरलँड्सला पछाडत तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय. तसेच यूएसएच्या विजयामुळे आता भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात सुपर 8 च्या हिशोबाने कसा परिणाम झालाय? हे जाणून घेऊयात.
ताज्या आकडेवारीनुसार, यूएसए आणि नेदरलँड्स दोन्ही संघांनी 3 पैकी फक्त 1 सामना जिंकलाय. तर 2 सामने गमावले आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ अजिंक्य आहेत. टीम इंडिया नेट रनरेट चांगला असल्याने समसमान 4 गुण असूनही पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आता यूएसने विजय मिळवल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ हा थेट सुपर 8 मध्ये पोहचणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे आधीच हायव्होल्टेज असलेल्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना आणखी रस्सीखेच पाहायला मिळणार हे निश्चित आहे. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध 8 पैकी सर्वाधिक 7 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान केवळ एकदाच विजय मिळवता आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्यातील पहिला बॉल संध्याकाळी 7 वाजता टाकण्यात येणार आहे.
टीम इंडियाने आपले पहिले दोन्ही सामने शानदार पद्धतीने जिंकले. भारताने यूएसए आणि नामबियावर मात केली. मात्र आता भारताला तिसरा सामना यूएसए आणि नामिबियाच्या तुलनेत निश्चित आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध सलग तिसरा सामना जिंकून सुपर 8 मध्ये पोहचण्यात यशस्वी ठरणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.