IND vs SA : रोको जोडीचा तडाखा, कॅप्टन केएलचा फिनिशिंग टच, दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

India vs South Africa 1st Odi : भारताला 300 पार पोहचवण्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी प्रमुख योगदान दिलं. विराटने रांचीत विक्रमी शतक झळकावलं. तर हिटमॅननेही चाबूक खेळी केली.

IND vs SA : रोको जोडीचा तडाखा, कॅप्टन केएलचा फिनिशिंग टच, दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Rohit Sharma and Virat Kohli
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Nov 30, 2025 | 7:04 PM

टीम इंडियाच्या फलंदाजांनी कसोटी मालिकेतील पराभव विसरुन एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात धमाका केला आहे. भारताने रांचीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 रन्स केल्या. भारताला 349 धावांपर्यंत पोहचवण्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर कॅप्टन केएल राहुल आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा या दोघांनी निर्णायक योगदान दिलं. भारतासाठी विराट कोहली याने सर्वाधिक धावा केल्या. विराटने शतक केलं. तसेच रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी अर्धशतक झळकावलं. आता टीम इंडियाचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला किती धावांवर रोखणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

भारताकडून टॉस गमावून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही सलामी जोडी बॅटिंगसाठी आली. यशस्वीने काही फटके मारुन भारताला आक्रमक सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या 25 धावा असताना यशस्वी आऊट झाला. यशस्वीने 18 धावा केल्या. यशस्वीनंतर विराट कोहली मैदानात आला.

रोहित-विराटची फटकेबाजी

विराट आणि रोहित या जोडीने टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. या दोघांनी दोन्ही बाजूंनी फटकेबाजी केली. त्यामुळे या दोघांमध्ये आधी अर्धशतक कोण करणार? अशी चुरस पाहायला मिळाली. मात्र विराटने बाजी मारली. विराटनंतर रोहितने अर्धशतक झळकावलं. दोघेही सेट झाले होते. त्यामुळे या जोडीला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र मार्को यान्सेन याने रोहितला एलबीडब्ल्यू आऊट केलं. रोहित 57 रन्सवर आऊट झाला. यासह दोघांनी केलेली 136 रन्सची पार्टनरशीप ब्रेक झाली.

रोहितनंतर ऋतुराज गायकवाड आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे ठराविक अंतराने आऊट झाले. ऋतुराज 8 आणि सुंदरने 13 धावा केल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 4 आऊट 200 अशी झाली. त्यानंतर भारताने पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

केएल-जडेजाची निर्णायक खेळी

विराट आणि केएल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. विराटने या भागीदारी दरम्यान 52 वं शतक झळकावलं. विराटने शतकानंतर गिअर बदलला. त्यामुळे विराट 200 धावाही करु शकतो, असं चित्र होतं. मात्र विराटच्या खेळीचा 135 धावांवर शेवट झाला. विराटने या खेळीत 7 सिक्स आणि 11 चौकार लगावले. विराट आऊट झाल्याने केएलसोबतची 76 धावांची भागीदारी मोडीत निघाली. त्यानंतर केएल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 36 बॉलमध्ये 65 रन्स जोडल्या. केएल राहुल याने 60 धावा केल्या. तर जडेजा 32 धावांवर आऊट झाला. तर हर्षित राणा याने 3 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेसाठी एकूण 5 गोलंदाजांनी बॉलिंग केली. त्यापैकी प्रेनेलन सुब्रायेन याचा अपवाद वगळता इतर चौघांनी विकेट्स घेतल्या. मार्को यान्सेन, नांद्रे बर्गर, कॉर्बिन बॉश आणि ओटनील बार्टमॅन या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.