IND vs SA : टेम्बा बावुमाचं झुंजार अर्धशतक सार्थकी, दक्षिण आफ्रिकेची विजयी सुरुवात, भारताचा 30 धावांनी पराभव

India vs South Africa 1st Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसऱ्याच दिवशी निकाल लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 30 धावांनी विजय मिळवला.

IND vs SA : टेम्बा बावुमाचं झुंजार अर्धशतक सार्थकी, दक्षिण आफ्रिकेची विजयी सुरुवात, भारताचा 30 धावांनी पराभव
South Africa Cricket Team
Image Credit source: PTI
Updated on: Nov 16, 2025 | 3:26 PM

टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची दणदणीत सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिल्याच सामन्यात 30 धावांनी धुव्वा उडवला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 124 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र फिरकीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कमाल केली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 100 पारही पोहचू दिलं नाही. दक्षिण आफ्रिकेने भारताचं 35 ओव्हरमध्ये 93 धावांवर पॅकअप केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तसेच दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे.

सामन्यात काय झालं?

जसप्रीत बुमराह याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवशी 159 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे भारताकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुपर कमबॅक केलं. दक्षिण आफ्रिकेने भारताला 189 धावावंर रोखलं. त्यामुळे भारताला 30 धावांचीच आघाडी मिळाली.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेट्स गमावून 93 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 63 धावांची आघाडी मिळवली. तर तिसर्‍या दिवशी दक्षिण आफ्रिकेने कॅप्टन टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात 3 विकेट्सच्या मोबदल्यात 60 धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे दुसर्‍या डावात 153 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेसाठी कॅप्टन बावुमा याने सर्वाधिक आणि नाबाद 55 धावा केल्या. तर कॉर्बिन बॉश याने 25 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियासाठी रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचे फलंदाज ढेर

टीम इंडियाची 124 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. तसेच भारताला 100 धावाही करता आल्या नाहीत. आधीच भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल मानेच्या त्रासामुळे तिसऱ्या दिवशी खेळणार नसल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे भारताच्या हातात हा सामना जिंकण्यासाठी 9 विकेट्सच असल्याचं स्पष्ट होतं. अशात भारताच्या फलंदाजांनी निराशा केली. एकालाही मैदानात घट्ट पाय रोवून भारताला विजयापर्यंत पोहचवता आलं नाही. परिणामी भारताचा पराभव झाला.

दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

भारतासाठी दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 31 धावा केल्या. अक्षर पटेल याने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षरही अपयशी ठरला. अक्षरने 26 रन्स केल्या. रवींद्र जडेजा याने 18 आणि ध्रुव जुरेलने 13 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. सायमन हारमर याने दोन्ही डावात प्रत्येकी 4-4 अशा एकूण 8 विकेट्स मिळवल्या. मार्को यान्सेन आणि केशव महाराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एडन मारक्रम याने 1 विकेट घेत भारताला ऑलआऊट करण्यात योगदान दिलं.