IND vs SA: भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं कडवं आव्हान, वनडेत दोघांपैकी वरचढ कोण?
India vs South Africa Odi Series 2025 : दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करत जोरदार सुरुवात केली. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

कसोटी मालिकेतील लाजिरवाणा पराभव विसरुन आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा भारताताच कसोटी मालिकेत 0-2 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना हा 30 नोव्हेंबरला रांचीत होणार आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतावर वनडे सीरिजमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारताचं नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिकेने वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडिया विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत? हे आपण आकड्यांच्या मदतीने जाणून घेऊयात.
भारतीय संघाला काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत पराभूत व्हावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-1 ने पराभव केला होता. त्यामुळे आता टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करते याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
दोघांपैकी सरस कोण?
भारतात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 32 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 32 पैकी सर्वाधिक 18 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 14 सामन्यांमध्ये पलटवार करत भारताला पराभूत केलं आहे. फक्त 4 सामन्यांच्या अपवाद वगळला तर दक्षिण आफ्रिकेने भारतात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताला सहजासहजी ही मालिका जिंकता येणार नाही.
उभयसंघात एकूण किती मालिका?
तसेच टीम इंडियाने भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 पैकी 6 एकदिवसीय मालिकेवर नाव कोरलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला भारतातच 2 एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं आहे. तर उभयसंघातील 1 मालिका बरोबरीत राहिली.
दक्षिण आफ्रिकने भारतात टीम इंडिया विरुद्ध अखेरीस 2015-2016 साली एकदिवसीय मालिका जिंकली होती. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने पराभूत केलं होतं. तर भारताने दक्षिण आफ्रिकेला 2023 मध्ये केएल राहुल याच्या नेतृत्वात 2-1 विजय मिळवला होता. तर आता शुबमन याच्या दुखापतीमुळे पुन्हा एकदा केएल राहुल याला नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे केएल राहुल पुन्हा एकदा भारताला मालिका जिंकून देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
