
कोलकाता कसोटी सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियावर गुवाहाटी कसोटी सामना गमवण्याची वेळही आली आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असूनही टीम इंडियावर अशी वेळ ओढावली आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 201 धावांवर आटोपला. टीम इंडिया 288 धावांनी पिछाडीवर राहिली. त्यामुळे इतक्या मोठ्या आघाडीनंतर दक्षिण अफ्रिका त्यात विजयी धावांची भर घालत आहे. दुसऱ्या डावाचा खेळ सुरु होताच दक्षिण अफ्रिका 300च्या पुढे निघून गेली आहे. यात आणखी भर पडणार यात काही शंका नाही. त्यामुळे उर्वरित दोन दिवसात भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेल्याचं दिसत आहे. असं असताना भारतीय संघाची मधली फळी चिंतेचा विषय ठरली आहे. कर्णधार ऋषभ पंतही बेभरवशी फलंदाज आहे. चालला तर चालला नाही तर काहीच नाही. या दरम्यान, करूण नायरची क्रिप्टिक पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
करूण नायरने एक पोस्ट लिहित शेअर केलं की, ‘ काही परिस्थिती तुम्हाला मनापासून माहित असतात आणि तिथे नसल्याची शांतता स्वतःची एक वेगळीच वेदना वाढवते .’ करूण नायरची ही क्रिप्टिक पोस्ट क्रीडारसिक भारतीय संघाच्या स्थितीशी जुळवत आहेत. करूण नायर गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. पण त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी दिली. त्यानंतर त्याला संघातून डावलण्यात आलं आहे. आठ वर्षांनी त्याने भारतीय संघात कमबॅक केलं होतं. मात्र त्याच्यासाठी इंग्लंड दौरा काही खास ठरला नाही. त्यामुळे निवडकर्त्यांना डावलण्याचं निमित्त मिळालं.
Some conditions carry a feel you know by heart — and the silence of not being out there adds its own sting.
— Karun Nair (@karun126) November 24, 2025
दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी गमवल्यास गौतम गंभीरची नाक कापल्यासारखंच होणार आहे. कारण त्याच्या प्रशिक्षणाखाली दुसऱ्यांदा टीम इंडियाला देशात झालेल्या कसोटी मालिकेत क्लिन स्विप मिळणार आहे. त्यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेचं गणितही चुकणार आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांच्या कसोटी मालिका 5-0 ने विजय मिळवणं तर कठीण आहे. त्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटी मालिकाही कठीण जाणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणं कठीण दिसत आहे.