
भारत आणि दक्षिण अफ्रिका विरुद्धचा दुसरा कसोटी खूपच महत्त्वाचा आहे. भारतीय संघावर मालिका गमवण्याचं संकट उभं आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी काहीही करून जिंकावं लागणार आहे. पण भारताच्या या सामन्यापूर्वीच टेन्शन आहे. कारण शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने या सामन्याला मुकला आहे. तसेच कर्णधारपद ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. त्यामुळे या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगली कामगिरी करेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू. आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागेल. विकेट खूपच चांगली दिसतेय. आधी फलंदाजी करा, आधी मोठा स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. खेळपट्टीवर खरोखरच कोणतेही क्रॅक नाहीत. खूप उत्साहित आहे, या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्यास आनंदी आहे. एक बदल असून मुथुस्वामी येतोय.’
ऋषभ पंतकडे शुबमन गिलच्या गैरहजेरीत कर्णधारपद देण्यात आले आहे. ऋषभ पंत म्हणाला की, ‘ हा एक अभिमानाचा क्षण आहे, ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचा आभारी आहे. तुम्हाला दोन्ही हातांनी ती संधी मिळवायची आहे. दोन बदल आहेत. नितीश रेड्डी आणि साई सुदर्शन संघात आले आहेत.’ खेळपट्टीच्या हिशेबाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. या सामन्यातील निकालावर प्रशिक्षक गौतम गंभीर याचीही कसोटी असणार आहे. त्यामुळे हा सर्वार्थाने महत्त्वाचा असणार आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकन संघ भारताला क्लीन स्वीप देण्याच्या उद्देश्याने मैदानात उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वायन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (डब्ल्यू), मार्को यानसेन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज