IND vs SA : गुवाहाटीत गोलंदाज कहर करणार? खेळपट्टी कुणासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या
Ind vs Sa 2nd Test Guwahati Pitch Report : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये कसोटी सामना खेळवण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या सामन्यात खेळपट्टी कुणाच्या बाजूने बॅटिंग करणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट.

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्याच जाळ्यात अडकला. भारताने कोलकातामधील इडन गार्डन्समधील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरेल, अशी तयार करुन घेतली होती. मात्र हाच डाव भारतावरच उलटला. भारताला या फिरकीपटूंसाठी पूरक असलेल्या खेळपट्टीवर 124 धावाही करता आल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेने भारताला 93 धावांवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी भारतावर विजय मिळवला. या अशा निकालामुळे क्रिकेट वर्तुळात कोलकातामधील खेळपट्टीवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा क्रिकेट सामना हा गुवाहाटीत होणार आहे. गुवाहाटीत खेळपट्टी कशी असणार? हे आपण जाणून घेऊयात.
गुवाहाटीतील पहिलाच कसोटी सामना
कोलकातील पहिला सामना गमावल्याने टीम इंडिया या 2 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला मालिका पराभव टाळायचा असेल तर काहीही करुन गुवाहाटीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. गुवाहाटीत 22 नोव्हेंबरपासून दुसऱ्या सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना बारसपारा स्टेडियममध्ये होणार आहे. गुवाहाटीत कसोटी सामन्याचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
गुवाहाटीची खेळपट्टी कशी?
गुवाहाटीतील खेळपट्टी ही लाल मातीने तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीवर साधारण गवत आहे. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळणार आहे. थंड हवामानामुळे खेळपट्टीवर दव असू शकतं. तसेच वेगवान गोलंदाजांना पहिल्या सत्रात खेळपट्टीतून मदत मिळू शकते.
साधारणपणे गुवाहाटीच्या मैदानातील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असते. या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा होण्याची शक्यता आहे. मात्र तिसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीतून मदत मिळू शकते. तसेच लाल मातीमुळे वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यात खेळपट्टीतून मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकंदरीत पाहता या खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळणार असल्याचा अंदाज क्रिकेट चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
2 खेळाडू दुसऱ्या कसोटीतून आऊट
दरम्यान दुसऱ्या कसोटीतून 2 खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांच्या 1-1 खेळाडूला दुसऱ्या कसोटीला मुकावं लागलं आहे. भारतीय कर्णधार शुबमन गिल याला मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाहीय. त्यामुळे शुबमनच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत नेतृत्वाची कमान सांभाळणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याला बरगड्याला झालेल्या दुखापतीमुळे खेळता येणार नाहीय.
