
भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांत मायदेशात झालेल्या 3 कसोटी मालिकांमध्ये दुसऱ्यांदा व्हाईटवॉश व्हावं लागलं. भारताचा न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेने धुव्वा उडवला. भारताला न्यूझीलंडने 2024 साली 3-0 अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताला 2-0 ने पराभूत केलं. टीम इंडियावर या पराभवानंतर जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र टीम इंडिया वनडे सीरिजमधून कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात यांच्यात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील सामने कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
रविवार 30 नोव्हेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा रांचीत झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबरला दुसरा सामना होणार आहे. दुसरा सामना रायपूरमधील वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा विशाखापट्टणमध्ये होणार आहे.
टेम्बा बवुमा हाच कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेतही दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. मात्र भारताचा नियमित कर्णधार बदलण्यात आला आहे. शुबमन गिल याला मानेच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. शुबमन याला कोलकातातील इडन गार्डन्समध्ये आयोजित पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी बॅटिंग करताना मानेला दुखापत झाली होती. शुबमनला या दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर आता शुबमनला या 3 एकदिवसीय सामन्यांतूनही बाहेर व्हाव लागलंय.
त्यामुळे शुबमन याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याला भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे केएल राहुल कॅप्टन म्हणून कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पहिला सामना, 30 नोव्हेंबर, रांची
दुसरा सामना, 3 डिसेंबर, रायपूर
तिसरा सामना, 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची अनुभवी जोडी खेळताना दिसणार आहे. हे दोघे अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत खेळले होते. त्यानंतर आता या दोघांना खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.