
टेस्ट आणि वनडे सीरिज झाल्यानंतर टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आता टी 20I सीरिज खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेची भारत दौऱ्यातील ही शेवटची मालिका असणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने होणार आहेत. पहिला टी 20I सामना हा 9 डिसेंबरला होणार आहे. हा सामना कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर एडन मार्रक्रम याच्या खांद्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. एडनला आयपीएलमुळे भारतातील खेळपट्टींचा आणि परिस्थितीचा अंदाज आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी ही मालिका सोपी नसणार.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण किती टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत? हे आपण या मालिकेनिमित्ताने जाणून घेऊयात. आतापर्यंत दोन्ही संघात एकूण 31 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत 6 सामने जास्त जिंकले आहेत. भारताने या 31 पैकी सर्वाधिक 18 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 12 सामन्यांमध्ये पलटवार केला आहे. मात्र कसोटी मालिकेतील कामगिरी पाहता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला कमी लेखण्याची चूक करणार नाही. त्यामुळे या मालिकेतून चाहत्यांना दोन्ही संघात तगडा सामना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आकडे पाहता दक्षिण आफ्रिकेला टीम इंडिया विरुद्ध टी 20I मालिका जिंकणं अवघड असल्याचं स्पष्ट होतं. दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध 2 वेळाच टी 20I मालिकेत विजय साकारता आला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2012 साली एकमेव टी 20I सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने हा एकमेव टी 20I सामना जिकंला होता. तर 2015 साली दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांची टी 20I मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली होती. मात्र तेव्हापासून टीम इंडियाचा दबदबा कायम आहे. टीम इंडिया गेल्या 10 वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेवर टी 20I मालिकेत वरचढ राहिली आहे.
दरम्यान उभयसंघातील मालिकेतील सर्व सामने हे टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येतील? हे जाणून घेऊयात. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सर्व टी 20I सामने टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर दाखवण्यात येणार आहेत. तर मोबाईल आणि लॅपटॉपवर सामने जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येतील.