
क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. क्रिकेट चाहत्यांची 3 तासांची प्रतिक्षा व्यर्थ ठरली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20I मालिकेतील चौथा आणि निर्णायक सामना धुक्यामुळे रद्द करावा लागला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघातील या चौथ्या सामन्याचं आयोजन हे लखनौतील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र धुक्यामुळे या सामन्यात टॉसही झाला नाही. धुक्यामुळे पंचांकडून 4-5 वेळा पाहणी करण्यात आली. पंचांनी रात्री 9 वाजून 25 मिनिटांनी अखेरीस पाहणी केली. त्यानंतर बीसीसीआयकडून अखेर हा सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मोठ्या उत्साहाने स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची निराशा झाली.
नियोजित वेळेनुसार लखनौतील एकाना स्टेडियममध्ये संध्याकाळी साडे 6 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र त्याआधीच मैदानात धुक्याचं वातावरण होतं. त्यामुळे या सामन्यात पहिल्यांदा नाणेफेकीला विलंब झाला. त्यामुळे 6 वाजून 50 मिनिटांनी पहिल्यांदा पाहणी करण्यात आली. मात्र पंचांना अपेक्षित अशी स्थिती नव्हती. त्यानंतर दर 30 मिनिटांनी 4 वेळा पाहणी करण्यात आली. पंचांनी साडे सात, 8, साडे आठ आणि 9 अशा 4 वेळा पाहणी केली. मात्र सामनाच्या दृष्टीने योग्य अशी स्थिती नव्हती. त्यामुळे बीसीसीआयकडून 9 वाजून 25 मिनिटांनी पाहणी करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
तसेच किमान 5 षटकांचा खेळ होण्यासाठी कट ऑफ वेळ ही 9 वाजून 47 मिनिटं अशी होती. त्यामुळे 9 वाजून 25 मिनिटांनी होणारी पाहणी निर्णायक ठरणार होती. मात्र 9 वाजून 25 मिनिटांनी पाहणी झाली. त्यानंतर चाहत्यांचा जी भीती होती तेच झालं. सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं गेलं.
धुक्यामुळे सामना रद्द
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞: The fourth India-South Africa T20I is called off due to excessive fog.#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QWDUVFxVlP
— BCCI (@BCCI) December 17, 2025
उभयसंघातील चौथा सामना हा धुक्यामुळे रद्द झाल्याने टीम इंडियाचा विकेटकीपर संजू सॅमसन हा दुर्देवी ठरला. संजूला गेल्या 5 टी 20i सामन्यांपासून प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र चौथ्या सामन्यातून टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं. शुबमनच्या पायाच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित होतं. मात्र सामना न झाल्याने संजूची ही संधी हुकली. अशाप्रकारे संजू दुर्देवी ठरला.