Team India : टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका केव्हा? एकूण 2 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक

Indian Cricket Team Test Series Schedule : टीम इंडिया वेस्ट इंडिजनंतर आपल्या पुढील कसोटी मालिकेतही 2 सामने खेळणार आहे. टीम इंडियासमोर या सीरिजमध्ये कुणाचं आव्हान असणार? हे सामने कुठे होणार? जाणून घ्या.

Team India : टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका केव्हा? एकूण 2 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक
IND vs WI Test Series 2025
Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 14, 2025 | 6:03 PM

भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या पहिल्या मालिकेत दणदणीत विजय मिळवला. भारताने शुबमन गिल याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. टीम इंडियाची ही डब्ल्यूटीसी (WTC 2025-2027) दुसरी मालिका होती. भारताने इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर मायदेशात वेस्ट इंडिजला दोन्ही सामन्यात पराभूत केलं. भारताने अशाप्रकारे 2 मालिकांमध्ये एकूण 4 सामने जिंकले. त्यानंतर आता टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका केव्हा होणार? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

टीम इंडिया विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तर 19 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. उभयसंघात 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. शुबमन गिल या मालिकेतून कर्णधारपदाची सूत्र हातात घेणार आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या माजी कर्णधारांचं कमबॅकही होणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही वनडे सीरिज खास असणार आहे.

वनडे सीरिजनंतर टी 20I मालिकेचा थरार

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. आशिया कपनंतर टीम इंडियाची ही पहिलीच टी 20I मालिका असणार आहे. भारताने अजिंक्य राहत आशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे टीम इंडियाची युवा ब्रिगेड ऑस्ट्रेलियात कशी कामगिरी करते? याकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता झाल्यानंतर टीम इंडिया मायदेशात डब्ल्यूटीसी 2025-2027 या साखळीतील आपली तिसरी मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने होणार आहेत. कसोटी मालिकेचं आयोजन हे 14 ते 26 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 ते 18 नोव्हेंबर, इडन गार्डन

दुसरा सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, गुवाहाटी