IND vs SA Test : भारताचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला, गोलंदाजांसमोर धावा रोखण्याचं आव्हान
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा डाव 245 धावांवर आटोपला. केएल राहुल वगळता एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा आहे. अंतिम फेरीसाठी विजयी टक्केवारी खूपच महत्त्वाची आहे. असं असताना भारतासाठी दक्षिण अफ्रिका दौरा खूपच महत्त्वाचा आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकही पराभव महागात पडू शकतो. असं असताना पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाची निराशाजनक कामगिरीचं दर्शन घडलं. भारतचा संपूर्ण संघ अवघ्या 245 धावांवर बाद झाला. मधल्या फळीच्या केएल राहुलने एककी झुंज दिली. त्याने 137 चेंडूत 101 धावा केल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 245 पर्यंत पोहोचण्यास मदत झाली. विराट कोहलीने 38 आणि श्रेयस अय्यरने 31 धावा केल्या. या व्यतिरिक्त सर्वजण फेल ठरले असंच म्हणावं लागेल. तळाशी आलेल्या शार्दुल ठाकुरने 24 धावा करत साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र तोही जास्त काळ खेळपट्टीवर काढू शकला नाही.
दक्षिण अफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 5 गडी बाद केले. त्यानंतर नंद्रे बर्गर याने 3, मार्को यानसेन आणि गेराल्ड कोएत्झी याने प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे 245 धावा रोखण्याचं मोठं आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आहे. जर ही धावसंख्या रोखण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना यश आलं नाही. तर पराभवाच्या दिशेने भारताची आगेकूच असेल हे मात्र नक्की. तसेच दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल.
India put on a competitive total on board, courtesy of another KL Rahul special in Centurion 👏
📝 #SAvIND: https://t.co/REqMWoHhqd | #WTC25 pic.twitter.com/yJg743v9EW
— ICC (@ICC) December 27, 2023
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना गमावला तर अव्वल स्थान गमवावं लागेल. सध्या भारत अव्वल स्थानी आहे. एका पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला फायदा होईल. तसेच भारताची घसरण तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी होऊ शकते. वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दोन संघांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
