IND vs SL : भारताचा कसोटी विजय, श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 165 धावांनी नमवलं

भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण श्रीलंकन संघ धावा करू शकला. भारताने या विजयासह दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

IND vs SL : भारताचा कसोटी विजय, श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 165 धावांनी नमवलं
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 19, 2026 | 1:38 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने भारताने श्रीलंकेत अपेक्षित कामगिरी केली आहे. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला 165 धावांनी नमवलं. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारताने 178 धावांची आघाडी घेतली होती. त्यात दुसऱ्या डावात 193 धावांची भर घातली आणि 371 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेला विजयासाठी 372 धावांची गरज होती. पण श्रीलंकेला काही या धावांपर्यंत मजल मारता आली नाही. श्रीलंकेचा संघ 206 धावांवर तंबूत परतला. या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारताची विजयी टक्केवारी वाढली आहे. आता दुसऱ्या सामन्यावर भारतीय संघाचं लक्ष असणार आहे. श्रीलंकेला क्लिन स्विप देऊन अंतिम फेरीच्या दिशेने कूच करण्याची संधी आहे.

नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने फलंदाजी करत पहिल्या डावात 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. भारताने श्रीलंकेला 284 धावांवर रोखलं आणि 178 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फिरकीची जादू स्पष्ट दिसत होती. अशा स्थितीत भारताने सर्व गडी गमवून 193 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 371 धावा झाल्या. यासह श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवलं. श्रीलंकेचा संघ 206 धावा करू शकला. भारताने हा सामना 165 धावांनी जिंकला.

श्रीलंकेचा डाव

भारताने विजयासाठी ठेवलेल्या 372 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात डळमळीत झाली. आघाडीचे चार फलंदाज झटपट बाद झाले. निशान मदुष्का 6, लहिरू उदारा 16, कामिंदु मेंडिस 2 आणि पासिंदू सूरियाबंदारा खातंही खोलू शकला नाही. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 4 गडी गमवले होते. पण पाचव्या दिवशी कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि सोनल दिनुषा यांनी भारतीय गोलंदाजांना झुंजवलं.या जोडीने पाचव्या विकेसाठी 95 धावांची भागीदारी केली. धनंजय डिसिल्वा 59 धावांवर असताना रवींद्र जडेजाने त्याची विकेट काढली आणि भारताचा विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. सोनल दिनुषा 84 धावा करून बाद झाला आणि भारताचा विजय पक्का झाला. शेपटाच्या फलंदाजांना फार काही करता आलं नाही. निरोशन डिकवेला 10, केशारा नुवांथा 20, प्रभात जयसूर्या 0 आणि लाहिरू कुमारा 0 धावा करून बाद झाले.

मानव सुथारने करून दाखवलं

भारताकडून फिरकीपटू मानव सुथार कमाल केली. त्याने 23.4 षटकात 55 धावा देत 6 विकेट काढल्या. तर प्रसिद्ध कृष्णाच्या वाटेला 2 विकेट आल्या. तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र कुलदीप यादव आणि देवदत्त पडिक्कल यांना काही विकेट मिळाली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us