
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आपला पहिलावहिला विजय मिळवला आहे. टीम इंडिया आणि झिंबाब्वेला आपल्या सुपर 8 मोहिमेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडिया आणि झिंबाब्वे या दोन्ही संघांसाठी एकमेकांविरुद्धचा सामना हा करो या मरो असा होता. मात्र टीम इंडियाने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झिंबाब्वेवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने झिंबाब्वेवर 72 धावांनी जबरदस्त असा विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर झिंबाब्वेचं पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर भारताच्या विजयामुळे ए ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचली आहे. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचणारी दुसरी टीम ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेआधी इंग्लंडने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आता 5 संघांमध्ये 2 जागांसाठी चुरस आहे.
टीम इंडियाच्या पहिल्या 6 फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी केली. टीम इंडियाने या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 256 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात झिंबाब्वेनेही जोरदार प्रतिकार करत लढा दिला. झिंबाब्वेला हा सामना जिंकता आला नाही. मात्र झिंबाब्वेच्या फलंदाजांनीही आपली ताकद दाखवून दिली. झिंबाब्वेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 184 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाने यासह टी 20i क्रिकेटमध्ये धावांबाबत आपला दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला.
टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. अभिषेकने 55 आणि हार्दिकने नाबाद 50 धावा केल्या. तिलक 44 रन्सवर नॉट आऊट राहिला. इशान किशन याने 38 तर कॅप्टन सूर्याने 33 धावांचं योगदान दिलं. तर संजू सॅमसन याने 24 रन्स केल्या. झिंबाब्वेसाठी 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
झिंबाब्वेसाठी ओपनर ब्रायन बेनट याने धमाकेदार खेळी केली. ब्रायनने शेवटपर्यंत नाबाद राहत सर्वाधिक 97 धावा केल्या. ब्रायनने या खेळीत 6 सिक्स आणि 8 फोर ठोकले. कॅप्टन सिकंदर रझा याने 31 धावा करत फाईट दिली. मात्र इतरांना काही खास करता आलं नाही. भारतासाठी अर्शदीप सिंह याने 3 विकेट्स मिळवल्या. तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि शिवम दुबे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.