रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय, इंग्लंडला पराभूत करत मालिका खिशात
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 305 धावांचं लक्ष्य गाठलं. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. तसेच रोहित शर्माच्या शतकामुळे भारताचा विजय सोपा झाला. भारताने या विजयासह मालिका 2-0 ने खिशात घातली.

इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने सावध पण चांगली सुरुवात केली. पण 49.5 षटकात सर्व गडी गमवत 304 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 305 धावांचं आव्हान काही सोपं नव्हतं. यासाठी आघाडीच्या एका फलंदाजाला शतक ठोकणं आवश्यक होतं. रोहित शर्माचा फॉर्म पाहता काय होईल अशी धाकधूक लागली होती. पण रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सूर गवसला आहे. त्याने 90 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. मागच्या काही सामन्यांची उणीव त्याने भरून काढली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफूर्वी सूर गवल्याने क्रीडाप्रेमीही खूश आहेत. कारण रोहित शर्मामध्ये चांगली सुरुवात करून देण्याची ताकद आहे. आक्रमक फलंदाजीमुळे विरोधी संघाच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं जातं आणि विजय सोपा होतो. अगदी तसंच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झालं. रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. भारताने 44.3 षटकात 6 गडी गमवून हा सामना जिंकला.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 52 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्यानंतरही रोहित शर्माने आक्रमक अंदाज कायम ठेवला. रोहित शर्माने वनडे क्रिकेट कारकिर्दितलं दुसरं वेगवान शतक ठोकलं. यापूर्वी दिल्लीत 2023 साली अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध 76 चेंडूत शतक ठोकलं आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने मधल्या फळीत डाव सावरला आणि डाव पुढे नेला. पण अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्या धाव घेण्यावरून विसंवाद झाला. त्याचा फटका श्रेयस अय्यरला बसला आणि 44 धावांवर बाद झाला.
विराट कोहली या सामन्यात काही खास करू शकला नाही. एकीकडे रोहित शर्माने आपल्या खेळीने टीकाकारांची तोंडं बंद केली. दुसरीकडे, विराट कोहली मात्र एकेरी धावांवर बाद झाला. त्याने 8 चेंडूंचा सामना केला आणि एक चौकर मारत 5 धावा करून तंबूत परतला. आदिल राशीदच्या फिरकीत फसला आणि फिल सॉल्टकडे झेल देत बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद शमीही सुरुवातीच्या षटकात काही खास विकेट घेऊ शकला नाही. शेपटच्या एका फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. गस एटकिनसनला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. पण या सामन्यात सर्वात महागडा स्पेल टाकला. त्याने 7.5 षटकात 1 विकेट घेत 66 धावा दिल्या.