भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून श्रीलंकेला अजून 288 धावा करायच्या आहेत. या सामन्याच्या निकालाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात...

भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक
भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 18, 2026 | 6:43 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी 90 षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे विजयाची संधी आहे. भारताने चौथ्या दिवशी 193 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 371 धावा ठेवल्या. आता श्रीलंकेला विजयासाठी 372 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. त्यात श्रीलंकेने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 4 गडी गमवून 84 धावा केल्या आहेत. श्रीलंकेला विजयासाठी अजून 288 धावा, तर भारताला 6 विकेट्सची गरज आहे. खरं तर ही खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या सत्रातच श्रीलंकेला रोखून सामना जिंकेल अशी स्थिती आहे. पण क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे सामन्याचा निकाल हा जय पराजयाने ठरणार आहे. त्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारत कुठे?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 77.78 विजयी टक्केवारीसह पहिल्या, दक्षिण अफ्रिका 75 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, न्यूझीलंड 72.22 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या आणि बांग्लादेश 66.67 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेत भारतीय संघ 48.12 विजयी टक्केवारीसह पाचव्या, तर श्रीलंकन संघ 41.67 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यातील निकालाचा हमखास परिणाम गुणतालिकेत दिसून येईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी या सामन्यातील निकाल महत्त्वाचा आहे.

भारताने सामना जिंकला तर काय?

श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने जिंकला तर क्रमवारीत फार काही फरक पडणार नाही. भारतीय संघ पाचव्या स्थानावरच राहील. पण विजयी टक्केवारी कमालीची सुधारणार आहे. 48.12 टक्क्यांवरून थेट 53.55 टक्के होईल. तर श्रीलंकन संघही सहाव्या स्थानावरच राहिल, पण टक्केवारीत घसरण होईल. श्रीलंकन संघ सध्या 41.67 टक्क्यांवर आहे. त्यात घसरण होऊन 33.33 टक्के होईल.

भारताने सामना गमावला तर…

भारताने हा सामना गमावला तर मोठा फटका बसणार आहे. थेट गुणतालिकेत उलथापालथ होईल. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 53.33 टक्के होईल आणि पाचव्या स्थानावर विराजमान होईल. तर भारताच्या टक्केवारीत घसरण होत 43.33 टक्के होईल आणि सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागेल. त्यामुळे आता पाचव्या दिवशी काय निकाल लागतो याकडे लक्ष लागून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us