Ajinkya Rahane | खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद धोक्यात, दोन खेळाडू शर्यतीत

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज अशी ओळख असलेल्या अजिंक्य राहणेचं कसोटी करिअर धोक्यात आलं आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.

Ajinkya Rahane | खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद धोक्यात, दोन खेळाडू शर्यतीत
Ajinkya rahane

मुंबई : भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज अशी ओळख असलेल्या अजिंक्य राहणेचं कसोटी करिअर धोक्यात आलं आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने अजिंक्य रहाणेच्या दुखापतीचं कारण सांगत त्याला संघातून वगळलं आहे. मात्र क्रिकेटरसिकांमध्ये अजिंक्य रहाणेला संघ व्यवस्थापनाने डच्चू दिल्याचीच अधिक चर्चा आहे. कानपूर येथील कसोटी सामन्यात राहणे कर्णधारपद संभाळताना दिसून आला, मात्र त्याला मुंबईतील कसोटीत स्थान मिळवता आलं नाही. पहिल्या कसोटी सामन्यावेळी कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली होती, त्यामुळे टीमची धुरा राहणेकडे दिली होती. शिवाय राहणेला विराट कोहलीच्या अनुपस्थित कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा चांगला अनुभवही आहे. (India Tour of South Africa: Rohit Sharma set to replace Ajinkya Rahane as India’s new test vice-captain)

अजिंक्य रहाणेचे उपकर्णधारपदही धोक्यात असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पीटीआयने आपल्या वृत्तात लिहिले आहे की, खराब फॉर्ममुळे रहाणेला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत प्लेईंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही आणि त्यामुळे त्याच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपदही अडचणीत आलं आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा संघात परतल्यानंतर अजिंक्य रहाणेला त्याचं उपकर्णधारपददेखील गमवावं लागू शकतं. विराट कोहली संघात परत आला आहे आणि यादरम्यान शुभमन गिल, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर यांनीही चांगल्या धावा केल्या आहेत, ज्यामुळे रहाणेला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं अवघड झालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा उपकर्णधारपदाचे प्रबळ दावेदार आहे. तसेच के. एल. राहुलदेखील या शर्यतीत आहे. राहुल टी-20 संघाचा उपकर्णधार आहे.

रहाणे भारताबाहेर ‘वाघ’

विदेशी पिचवर जिथे इतर भारतीय फलंदाजांची पंचाईत होते, अशा ठिकाणी राहणेचा खेळ चांगला झाला आहे. ज्यावेळी टीम संकटात असते, त्यावेळी राहणेने अनेकदा जोमाने खिंड लढवत टीमला अडचणीतून बाहेर काढले आहे. ऑस्ट्रेलिया सिरीजमधून विराट कोहली परत आल्यानंतर राहणेच्या नेतृत्वातच टीम इंडियाने तब्बल 32 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात मात दिली होती. त्यानंतर अजिंक्य राहणेवर कौतुकाचा वर्षाव झाल्याचंही पहायला मिळालं. मात्र मागील काही दिवसांपासून राहणेच्या खराब खेळामुळे राहणेला कायमचं बाहेर जावं लागणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

रहाणे वर्षभरापासून आऊट ऑफ फॉर्म

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म गेल्या वर्षभरापासून कायम आहे. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याची बॅट शांतच राहिली. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात तो 35 धावा करुन बाद झाला तर दुसऱ्य डावात त्याला अवघ्या 4 धावांचं योगदान देता आलं. डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत शतक झळकावल्यानंतर अजिंक्य रहाणेला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील जागेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अजिंक्य रहाणेने 2021 मध्ये 12 कसोटी सामने खेळले असून 19.57 च्या सरासरीने 411 धावा केल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत त्याला केवळ दोनच अर्धशतकं झळकावता आली आहेत. 67 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. पहिल्या पाचमध्ये क्रमांकांवर खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये ही एका कॅलेंडर वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट धावांची सरासरी आहे. एका कॅलेंडर वर्षात अॅलन लँबच्या नावावर त्याच्यापेक्षा वाईट सरासरीचा विक्रम आहे. 1986 मध्ये त्याने 12 कसोटीत 19.33 च्या सरासरीने 406 धावा केल्या होत्या. तसेच यापूर्वी कधीही कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेची धावांची सरासरी 30 च्या खाली गेली नव्हती, परंतु यावर्षी ती 20 पेक्षा कमी आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याची सरासरी 2013 मध्ये 43.40, 2014 मध्ये 44.94, 2015 मध्ये 45.61, 2016 मध्ये 54.41, 2017 मध्ये 34.62, 2018 मध्ये 30.66, 2019 मध्ये 71.33, 2020 मध्ये 38.85 आणि 2021 – 19.57 इतकी राहिली आहे.

खराब सरासरी

2021 मध्ये खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेचे कसोटीतील आकडे खूपच खालावले आहेत. भारतासाठी 75 कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांमध्ये त्याची सरासरी सर्वात वाईट आहे. रहाणेने 79 कसोटीत 39.30 च्या सरासरीने 4795 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 12 शतके आणि 24 अर्धशतके आहेत. रहाणे वगळता, 75 पेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या भारताच्या एकाही फलंदाजाची सरासरी 40 पेक्षा कमी नाही. अशा स्थितीत रहाणे टीम इंडियातून जवळपास बाहेर फेकला गेला असल्याचे मानले जात आहे.

इतर बातम्या

IND vs NZ : एजाज पटेलचा ‘चौकार’, मयंक अग्रवालचं शतक, टीम इंडियाची दिवसअखेर 4 बाद 214 पर्यंत मजल

IND vs NZ | सुमार कामगिरी की दुखापत, लोकल बॉय रहाणेच्या डच्चूमागील कारण काय?

IND vs NZ, 2nd Test, Day 2, Live Score: भारत 250 पार, मयंक-अक्षर मैदानात

(India Tour of South Africa: Rohit Sharma set to replace Ajinkya Rahane as India’s new test vice-captain)

Published On - 11:44 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI